भारती विद्यापीठात थ्री-डी तंत्रज्ञानावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
थ्री-डी तंत्रज्ञानाचा उपयोग आता रोगनिदान आणि रुग्ण सेवेमध्ये – डॉ गणेश काकंदीकर
पुणे : थ्री-डी तंत्रज्ञानाचा उपयोग आता रोगनिदान आणि रुग्ण सेवा यामध्ये प्रामुख्याने होत असल्यामुळे होमिओपॅथी औषधनिर्मिती आणि त्याचे रुग्णावरील परिणाम यांचा थ्री-डी तंत्रज्ञान वापरून मायक्रो आणि नॅनो स्तरावर संशोधन होणे गरजेचे आहे. असे मत एमआयटी डब्लूपीयुच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजीचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ गणेश काकंदीकर यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी १ ते ५ जुलै “ऐनहंसिन्ग थ्री-डी कोमेप्टन्सीस ऑफ मेडिकल स्कॉलर” या विषयावर आयोजित प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
भारती विद्यापीठ, डॉ विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे आणि डेसो सिस्टम्स ला फोंडेशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना थ्री-डी एक्सपेरियन्स सॉफ्टवेअरचा उपयोग करून थ्री-डी मॉडेलिंग, थ्री-डी स्कँनिंग, थ्री-डी प्रिंटिंग आणि रीव्हर्स इंजिनीअरिंगवर प्रशिक्षण देण्यात आले. नवनिर्मिती ही आजच्या युगाची गरज असून होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या उपचार पद्धतीमध्ये थ्री-डी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याबाबत संशोधन करावे असे आवाहनही काकंदीकर यांनी केले. प्राचार्य डॉ अविनाश म्हेत्रे यांनी थ्री-डी तंत्रज्ञानाच्या होमिओपॅथी उपचार पद्धतीतील अनुप्रयोगांच्या संभाव्य क्षेत्रांबाबत मार्गदर्शन केले. डेसो सिस्टम्सला फौंडेशनचे कार्यकारी संचालक सलीम हुझेफा यांनी विद्यार्थ्यांना बायोमेडिकल क्षेत्रासाठी डेसो सिस्टिम्सच्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी एमआयटीडब्लूपीयुच्या यंत्र अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ शिवप्रकाश बर्वे आणि डेसो सिस्टम्सचे अनुराग शुक्ला, अधिष्ठाता डॉ अनिता पाटील उपस्थित होते. एक आठवडा चालू असलेल्या शिबिरात डॉ राहुल जगताप, डॉ अनिल माशाळकर, प्रा अतुल पलंगे, डॉ समिधा जवादे, डॉ ओंकार कुलकर्णी, डॉ आशिष पवार, डॉ अभिषेक थोटे, डॉ प्रशांत कुमार, प्रा श्रीकांत यादव, सचिन पुरोहित आणि अलोक औंधकर यांनी प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ रश्मी मोरे यांनी केले तर आभार डॉ पूनम काकंदीकर यांनी मानले.