श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्रा डॉ रामदास खोपे यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी उभयता सत्कार
प्रा खोपे यांनी घडविले अनेक विद्यार्थी – हेमंत काळमेघ
नागपूर : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत डॉ रामदास उत्तमराव खोपे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी त्यांचा व पत्नी संगिता खोपे यांचा शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत काळमेघ यांच्या हस्ते उभयता सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओ एस देशमुख, माजी प्राचार्य डॉ देवेंद्र बुरघाटे, विज्ञान महाविद्यालय, पवनीचे प्राचार्य डॉ लेपसे, दुसरे सत्कारमूर्ती उभयता डॉ डाईलकर, प्रयोगशाळा परिचर उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना हेमंत काळमेघ म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे. नवीन पिढी घडविण्यासाठी डॉ खोपे यांनी सेवा काळात परिश्रमपूर्वक कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी मिळविली असून १ विद्यार्थी सध्या संशोधन कार्य करीत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे संशोधनपर ५२ संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांनी सिंगापूर आणि बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होऊन संशोधन पेपर सादर केले. ४ पुस्तके त्यांनी लिहिली असून क्वांटम, मेकॅनिक्स, फिजिकल केमेस्ट्री हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आहेत.
त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले असल्याची माहिती देऊन काळमेघ यांनी डॉ खोपे यांच्या भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्यात.
सत्कारप्रसंगी डॉ रामदास खोपे म्हणाले, शिक्षक म्हणून विद्यार्थी घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेत. मी विद्यार्थी असताना मला चांगल्या शिक्षकांचा सहवास लाभला हे मी माझे भाग्य समजतो. माझा विषय विद्यार्थ्यांना सोपा वाटावा यासाठी माझ्या सेवा काळात मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहेत. आज माझे विद्यार्थी देशातच नव्हे, तर जगामध्ये मोठमोठ्या संस्थेत कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवितात. त्याचप्रमाणे विद्यार्थी सुध्दा शिक्षकांसाठी अभिमान असतात.
याप्रसंगी प्रयोगशाळा परिचर डाईलकर यांचा सुद्धा उभयता सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ अवचार, डॉ राजेंद्र देशमुख, डॉ खैरे, डॉ अणे तसेच डॉ दर्शना खोपे, डॉ पांडे, डॉ उताडे, डॉ तिवारी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ वैशाली किन्हीकर व डॉ रेशल देशमुख व आभार डॉ प्रिया देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकगण, कर्मचारी, विद्यार्थी, सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य, बाळकृष्ण खोपे, चेतन कोथळकर व दिनेश खोपे आदी उपस्थित होते.