उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सृष्टी संवर्धन शिबिरात वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सुरु असलेल्या सृष्टी संवर्धन शिबिरात बुधवार दि ३ जुलै रोजी वृक्ष दिंडी काढण्यात येवून वृक्षारोपण करण्यात आले. विद्यापीठात ७ जुलै पर्यंत हे उन्हाळी शिबिर सुरु आहे. बुधवारी सकाळी विद्यार्थी भवनापासून राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी उत्साहात दिंडी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी भजन तसेच वृक्ष संवर्धन गीत सादर केले.
कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी आणि शैलेजा माहेश्वरी हे वृक्षदिंडीत अग्रभागी होते. कुलगुरू प्रा माहेश्वरी यांचा बुधवारी वाढदिवस असल्याने ६१ झाडे लावण्यात आली. यामध्ये सीताफळ, रामफळ आदी वृक्षांचा समावेश आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, अधिष्ठाता प्रा अनिल डोंगरे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सचिन नांद्रे, अधिसभा सदस्य स्वप्नाली काळे, ऋषिकेश चित्तम, प्रा राजु आमले, राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समनव्यक डॉ दिनेश पाटील, प्रा मनीष करंजे, प्रा शिंगने, उद्यान अधिक्षक अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान या शिबिरात मंगळवारी प्रा प्रवीण पुराणिक यांनी संशोधनाच्या वाटा या विषयावर मार्गदर्शन केले. विकास तळेले अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थी विकास संचालक डॉ जयेंद्र लेकुरवाळे यांनी करीअरच्या वाटा यावर संवाद साधला. प्रा विश्वास भामरे अध्यक्षस्थानी होते. बुधवारी दुपारच्या सत्रात अमरावती येथील निशिकांत काळे यांनी ग्रीन एनर्जी या विषयावर तर डॉ अनील भोकरे यांनी सेंद्रीय शेती यावर मार्गदर्शन केले. या दोन्ही सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ विजय आहेर व अधिसभा सदस्य दिनेश चव्हाण होते.