सौै के एस के महाविद्यालयातील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक कर्मचारी यांचा सेवागौरव संपन्न
ज्या घरात ज्येष्ठांचा सन्मान ठेवला जातो ते घर श्रीमंत समजले जाते – डॉ दीपा क्षीरसागर
बीड : नवगण शिक्षण संस्थेच्या वतीने सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक कर्मचारी यांचा सेवागौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा सत्येंद्र पाटील व प्रा वसंत वंजारे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, संपूर्ण आहेर व सन्मानपत्र, श्रीगणेशाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर म्हणाल्या की, ज्या घरात ज्येष्ठांना सन्मानाने वागवले जाते ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते. सेवानिवृत्ती नंतर मन आनंदी ठेवण्यासाठी सतत सकारात्मक राहून स्वतःला कामात गुंतवून ठेवले पाहीजे. तसेच शरीर हे फिरते ठेवल्यास कार्यक्षमता वाढत जाते. काम केल्यामुळे मन प्रेरित होऊन माणुसकीने वागण्याची क्षमता माणसात निर्माण होते. माणसाने परस्परांच्या उणीवा पोटात ठेऊन, शिस्त ठेऊन, जगल्यास आयुष्य प्रेरणादायी होते. त्यामुळे सातत्याने माणसाने स्वतःला व्यस्त ठेवले पाहीजे.
नवगण शिक्षण संस्था ही सर्व जातीधर्मातील समाजबांधवाना घेऊन चालते. त्यामुळेच या संस्थेची धर्मनिरपेक्ष सर्वांना सामावून घेणारी संस्था म्हणून समाजात ओळख आहे. सेवानिवृत्त होणारे शिक्षक कर्मचारी यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणाने शिक्षण संस्थेबरोबर प्रामाणिक राहून कार्य केले आहे. यापुढेही आपण संस्थेशी निष्ठेने राहावे.
यावेळी बोलताना डॉ योगेश भैय्या क्षीरसागर यांनी आपण महाविद्यालयात दीर्घकाळ प्रामाणिकपणाने नौकरी केलेली आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपले कार्य चांगले आहे. नवगण शिक्षण संस्था सर्वधर्म समभाव हे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शैक्षणिक कार्य करत आहे. निवृत्तीनंतर आपले आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो व समाजाची सेवा घडो ही सदीच्छा त्यांनी व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष प्रा किशोर काळे यांनी प्रा सत्येंद्र पाटील व प्रा वसंत वंजारे यांच्या संदर्भातील अनेक आठवणींना उजाळा या प्रसंगी दिला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश तात्या पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा उमाकांत जगताप, डॉ श्रीमंत तोंडे, डॉ संजय मस्के व सत्कारमूर्ती प्रा सत्येंद्र पाटील व प्रा वसंत वंजारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ अन्सार उल्ला शफीउल्ला खान, कमवि उपप्राचार्य काकडे एन आर, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर आदीसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदनशिव, आभार डॉ बळीराम राख यांनी मानले.