डॉ डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ भाग्यश्री पाटील यांना वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान
‘राईज एन शाईन बायोटेक, पुणे येथील कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ भाग्यश्री प्रसाद पाटील यांना मानाचा “माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक पुरस्कार” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान
आधुनिक फुल शेतीमधील उल्लेखनीय कार्याचा गौरव
मुंबई : वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जन्मदिनी व कृषिदिनानिमित्त यंदाचा वसंतराव नाईक पुरस्कार डॉ भाग्यश्री प्रसाद पाटील (व्यवस्थापकीय संचालिका – राईज एन शाईन बायोटेक प्रा लि पुणे) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आधुनिक फुल शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सन्मानीय अतिथी – राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, विशेष अतिथी – महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू – डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थिती होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ राजेंद्र बारवाले यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे संपन्न झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभात डॉ भाग्यश्री पाटील यांना अभिनव शेतीसाठी पुरस्कार देताना त्यांचे कौतुक केले. त्यांच्या भाषणात त्यांनी असेही म्हटले की, “डॉ भाग्यश्री पाटील यांच्या प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण विचारांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवे मार्गदर्शन मिळाले आहे. त्यांच्या कार्यामुळे शेती क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात झाली आहे.” एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रातील नवोन्मेषी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि डॉ भाग्यश्री पाटील यांना सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले असे सांगितले. त्यांच्या मते, “शेतीमध्ये नवकल्पनांचा वापर करणे आजच्या काळाची गरज आहे आणि डॉ भाग्यश्री पाटील यांनी हे सिद्ध केले आहे की योग्य दृष्टिकोन आणि कष्ट यांच्या जोरावर शेतीतूनही मोठे यश मिळवता येते.” याशिवाय, शिंदे यांनी सांगितले की, “कृषी क्षेत्रातील अशा नवोदित तंत्रज्ञानांचा वापर करणार्या शेतकऱ्यांचा सन्मान करणे आपली जबाबदारी आहे आणि डॉ भाग्यश्री पाटील यांचे योगदान अतुलनीय आहे.”
तसेच कार्यक्रम दरम्यान महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुरस्कार वितरण समारंभात बोलताना म्हणाले, “डॉ भाग्यश्री पाटील यांच्या आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतींमुळे फुलशेतीच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. त्यांचे योगदान शेतकऱ्यांसाठी तसेच आगामी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे.”
“कृषी औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी साध्य करणारे, आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवणारे, हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांचा आशीर्वाद मला या कृषि पुरस्कारातून मिळाला आहे. आजचा हा सन्मान माझ्या भविष्याच्या कार्याला मिळालेली प्रेरणा असल्याचे मी समजते. या वाटचालीत खंबीरपणे साथ देणारे माझे पती डॉ पी डी पाटील सर आणि माझे कुटूंबीय तसेच राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व हितचिंतक यांचे या यशामध्ये महत्त्वाचे योगदान आहे.
असे डॉ भाग्यश्री पाटील म्हणाल्या त्यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि त्यापुढे म्हणाल्या “आज कृषि क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह नवकल्पना, कौशल्य, संशोधन सर्वाभीमुख अभ्यास, उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन ही बलस्थाने घेऊन केलेली शेती उत्पादन वाढीला गती देईल. स्मार्ट शेतीतूनच कृषी व्यवसाय समृद्ध होण्यास मदत होईल. आधुनिक शेतीद्वारे बलशाली राष्ट्र उभारणीस ताकद मिळेल”.
पारंपारिक शेती व्यवसाया पेक्षा तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती व सोबतच कृषि संशोधन तसेच कृषि विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने डॉ भाग्यश्री पाटील यांनी ‘राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. कंपनीच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करीत त्यांनी कृषी हित साध्य केले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत.
नानाविध प्रकारची फुलोत्पादनामध्ये प्रामुख्याने जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, स्पॅथिफिलम, कॉर्डिलिन, अल्पिनिया, पेरेनिअल्स, लिमोनियम, जिप्सोफिला, लिमोनियम, हायड्रेंजिया फुलांच्या जाती नर्सरी विभागांतर्गत फुलाच्या जाती अँथुरियम, गुझमनिया, पॉइन्सेटिया, कलांचो, क्रायसॅन्थेमम, फॅलेनोप्सिस तसेच फळांमध्ये केळी (ग्रँड नैन, येलक्की आणि लाल केळी) अननस, स्ट्रॉबेरी व ब्लू जावा (निळी केळी) आदी द्वारे आधुनिक शेती करण्यावर भर देत आहे.
“ग्रो इन इंडिया” हे अभियान यशस्वीरित्या राबवताना डॉ भाग्यश्री पाटील यांनी असंख्य छोट्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नतीचा मार्ग सुखकर केला आहे. ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व्हाव्यात याकरिता डॉ भाग्यश्री पाटील यांनी आपल्या व्यवसायामध्ये 95% हून अधिक महिलाना रोजगार प्रदान केला आहे. सोबतच महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी बनवले आहे.
शेतकरी व महिलांच्या सक्षमीकरणासोबतच डॉ भाग्यश्री पाटील या पिंपरीच्या डॉ डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती या पदावर देखील कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रभावी महिला नेतृत्व म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आधुनिक शेती, महिला सक्षमीकरण, शिक्षण या सर्व क्षेत्रात त्यांनी आपली मोहर उमटवली आहे.
मिळालेल्या या कृषी सन्मान बद्दल डॉ भाग्यश्रीताई पाटील यांचे अभिनंदन डॉ पी डी पाटील सर ( कुलपती डॉ डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे ) यांनी केले. ते पुढे म्हणाले सौ डॉ भाग्यश्री पाटील यांचा झालेला हा सन्मान त्यांच्या पुढील कार्याला उभारी देईल. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.