एमजीएम विद्यापीठात सुरू होणार महाराष्ट्रातील पहिली डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग सुविधा
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इनोव्हेशन इनक्युबेशन अँड रिसर्च सेंटरच्या (आयआयआरसी) वतीने देशातील तिसरी आणि महाराष्ट्रातील पहिली डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या ‘३ डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’चा उद्घाटन सोहळा गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रुक्मिणी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास डीआरडीओचे माजी तंत्रज्ञान संचालक डॉ यु चंद्रशेखर, शास्त्रज्ञ डॉ रमणदीप सिंग, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडवान्सड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ दिनेशसिंग ठाकूर, स्टार्टासिस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजीव बजाज आदि मान्यवर उपस्थित राहणार असून मेडिकल स्टार्टासिसचे उपाध्यक्ष ईरेझ बेन जीव्हि हे दुरदृश्यप्रणालीमार्फत इस्राईलवरुन उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘जे ८५० डिजिटल अॅनाटॉमी ३ डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी’ हे तंत्रज्ञान समकालीन काळामध्ये अत्यंत उपयुक्त असून याचा विविध क्षेत्रामध्ये वापर होत आहे. अॅनाटॉमिकल मॉडेल्स, बायोमेडिकल आणि बायोकंपॅटिबल मटेरियल्स तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रिया, उद्योग, शिक्षण आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, वाहन, एरोस्पेस, गायनॉकॉलॉजी, फिजिओथेरपी आणि डिझाइन अशा विविध क्षेत्रात प्रयोग केले जात आहेत.
एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याआधी जी ‘प्री सर्जिकल प्लॅनिंग’ केली जाते त्यामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. कॅडेव्हर ऑर्गन मिळत नसल्यामुळे शस्त्रक्रिया करणे कठीण जाते मात्र, आता या तंत्रज्ञानाच्या मदतीने तसेच ऑर्गन बनवून त्यावर प्रयोग करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे विविध उत्पादनाची डिझाईन बनविण्यासाठी आणि टेक्सटाइल डिझाईन पेंटिंगसाठीही या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्र एकत्रित येत या माध्यमातून संशोधन करू शकणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यास सर्वांना खुला प्रवेश असून अधिकाधिक नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.