इंडस्ट्री-युनिव्हर्सिटी’ साथ साथ – पार्ट २
उद्योजकांच्या सहकार्याने दोन पदविका अभ्यासक्रम
उद्योजकता व कौशल्य विकास केंद्राचा पुढाकार
सामंजस्य करारावर स्वाक्षरी
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने दोन पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. एन्टरप्रेनरशिप व स्किल डेव्हलमेन्ट सेंटर ( ‘ईएसडीसी’) यांच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षापासूनच सादर बॅच सुरु होणार असून सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
दिनदयाल उपाध्याय कौशल केंद्र येथे येथे बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज (इंडस्ट्री एम्बेडेड) हा कंपनीत नोकरी करणाऱ्या युवकांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम गेल्या आठवड्यात ‘लाँच’ करण्यात आला. पहिल्याच दिवशी सर्वच शंभर जागांसाठी नोंदणीही झाली. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी आणखी दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
यामध्ये एस्कलेटिंग ऍबिलिटीज एलएलपी (बंगलोर) व रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ (रिओश) या स्थानिक कंपनीचा समावेश आहे. ‘ईएसडीसी’चे समनव्यक प्र-कुलगुरू प्रा डॉ वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषद कक्षात ही बैठक झाली. या दोन्ही कंपन्यांच्या वतीने पन्ना दत्ता (सीईओ) तसेच ‘रिओश’चे संचालक डॉ सुभाष घाटकर यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी डॉ एम राजाराम व ‘ईएसडीसी’चे सहसमनव्यक डॉ कुणाल दत्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
या करारांतर्गत ‘डिप्लोमा इन इंडस्ट्रियल हेल्थ’ आणि ‘डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन’ हे दोन कोर्स सुरु करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनीत जाऊन प्रात्यक्षिक शिकायला मिळणार आहे. पदविका मिळवताना व्यावहारिक अनुभव मिळवा, विद्यार्थ्यांना संधी देऊन शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासूनच सुरू होणार आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्न राहून कौशल्याधारित युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देऊ, अशी ग्वाही उद्योजकांनी दिली तर विद्यापीठ प्रशासन उद्योजकांसोबत सकारात्मक व कृतीशील सहकार्य करील, अशी ग्वाही कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी दिली.