अमरावती विद्यापीठाची ‘बी ए सत्र-१ समाजशास्त्र’ विषयाची ६ जुलै रोजी पुन:परीक्षा होणार
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी – २०२४ बी ए सत्र – १ (सी बी सी एस) समाजशास्त्र विषयाची परीक्षा विशेष बाब म्हणून ६ जुलै, २०२४ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत यापूर्वीच निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.
बी ए सत्र – १ (सी बी सी एस) समाजशास्त्र विषयाची परीक्षा दि १८ जून, २०२४ ऐवजी दि २७ जून, २०२४ रोजी नियोजित करण्यात आली होती. परंतु दि १८ जून रोजीचे सर्व पेपर्स दि २ जुलै, २०२४ रोजी घेण्याचे पत्र निर्गमित झाल्यामुळे अनेक विद्यार्थी दि २७ जून, २०२४ रोजी परीक्षा केंद्रांवर अनुपस्थित होते. त्यामुळे कुलगुरूंनी दिलेल्या आदेशान्वये सदर परीक्षेचे पुनर्नियोजन करण्यात येत आहे.
परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे. ज्या विद्यार्थ्यांनी सदर विषयाची परीक्षा २७ जून, २०२४ रोजी दिलेली आहे, त्यांचे त्या परीक्षेचे गुण विचारात घेतले जातील. तसेच जे विद्यार्थी २७ जून, २०२४ रोजी सदर परीक्षा देऊनही जर ६ जुलै रोजी होणारी परीक्षा देण्यास इच्छूक असतील, त्यांना परीक्षा देण्याची मुभा आहे, मात्र अशा विद्यार्थ्यांचे ६ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेचेच गुण फक्त विचारात घेतले जातील, आणि त्यांनी २७ जून रोजीची दिलेली परीक्षा रद्द समजण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी कळविले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना पत्राव्दारे कळविण्यात आले असून संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालयांनी तातडीने अवगत करावे व काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांना ९८५००४२३५७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.