सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू
कुलगुरूंच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचे उद्घाटन; बीएससीसाठी थेट प्रवेश सुरू
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये बीएससी, बीकॉम पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले.
विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलामध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये बीएससी, बीकॉम पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा सचिन गायकवाड, रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ अंजना लावंड, डॉ विकास घुटे, डॉ आर एस मेंते, डॉ गौतम कांबळे, डॉ विनायक धुळप, पदवी अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ धवल कुलकर्णी, डॉ अनिल घनवट, डॉ प्रभाकर कोळेकर, डॉ सदानंद शृंगारे, डॉ मुकुंद माळी आदी उपस्थित होते.
बीएससी इन्व्हरमेंटल सायन्स, इंडस्ट्रियल मॅथेमॅटिक्स, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, फार्मासिटिकल मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी, पेंट टेक्नॉलॉजी, फार्मासिटिकल अँड फाईन केमिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात करता येणार आहे. बी कॉम (बीएफएसआय) आणि बीबीए तसेच बीसीए यासाठी देखील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बारावी शास्त्र व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन बीएससी व बीकॉमसाठी प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बीएससी सायन्ससाठी मॅथेमॅटिक्स, स्टॅटटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, जिओलॉजी, एनवोर्मेन्ट सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, बॉटनी, झूलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ञ मार्गदर्शक, अद्यावत सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगणे, लॅबोरेटरीज, इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासासाठी वस्तीगृहाची देखील सोय राहणार आहे.
प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी डॉ धवल कुलकर्णी (मो 9423591360), डॉ मुकुंद माळी (8830326615) व डॉ सदानंद शृंगारे (9096588918) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.