जिज्ञासा व आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यमाने आषाढी वारी वैद्यकीय सेवा शिबीराचे उद्घाटन
पुणे : जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम २०२४ शिबीराचे उद्घाटन समारंभ दि ३० जुन रोजी पुणे महानगरात नाना पेठ येथे पार पडले. याप्रसंगी प्रा डॉ मिलिंद निकुंभ (प्र – कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व नारळ वाढवून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ सुजित निलेगावकर, भवानी शंकर शर्मा, ॲड अनिल ठोंबरे, हर्षवर्धन हरपुडे, विठ्ठल महाराज खाडेकर (वारकरी माऊली), रजनी गायकवाड, रचित गादेकर, वैदेही आपटे (आषाढी वारी वैद्यकीय सेवा प्रमुख) हे देखिल यावेळी उपस्थित होते. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर जिज्ञासाच्या कार्यकत्यांनी पथनाट्य सादर केले व मोफत वैद्यकीय शिबिराची सुरूवात करण्यात आली.
या उपक्रमामध्ये पंढरपुर ला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. या या सेवा शिबिरामध्ये गरजू वारकऱ्यांना त्यांना झालेल्या वाढीचे योग्य निदान करून आयुर्वेद, होमिओपॅथी व ऍलोपॅथीच्या औषध देण्यात येते. तसेच वेदनाशमनार्थ आयुर्वेदातील अग्निकर्म व विद्धकर्म या पद्धतींचा वापर देखील केले गेले.
तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्टुडन्ट फॉर सेवा या आयामांतर्गत माऊलींची पदसेवा देखील करण्यात आले.
या सेवा शिबिरा सोबत वारीत येणाऱ्या वारकऱ्यांचे समाज प्रबोधन करण्यासाठी विविध सामाजिक विषयांवर जिज्ञासाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य उत्कृष्टरित्या सादर केले. या सेवा शिबिरामध्ये एकूण सात मेडिकल आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालयांमधील ३१४ वैद्यकीय विद्यार्थी व ३० डॉक्टरांच्या माध्यमातून १२५१ माऊलींना आरोग्यसेवा पुरविण्यात आली.