अमरावती विद्यापीठाच्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या प्रस्तावित बांधकाम परिसराची कुलगुरूंनी केली पाहणी
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केली पाहणी
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी विद्यापीठांतर्गत बुलढाणा येथे असलेल्या मॉडेल डिग्री ला नुकतीच भेट देवून महाविद्यालयाच्या प्रस्तावित बांधकामाच्या जागेची पाहणी केली. याप्रसंगी कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ विजय नागरे, अधिसभा सदस्य डॉ निलेश गावंडे, आशिष सावजी, बीरसिंगपूर येथील सरपंचपती संजय शिंदे, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी मंगेश वरखेडे, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, विजय चवरे, रमेश जाधव आदी उपस्थित होते.
बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याकरीता शासनाने बीरसिंगपूर शिवारात, अजिंठा रोडलगत, सैनिक शाळेच्या शेजारी 15 एकर जमीन मंजूर केलेली आहे. महाविद्यालयाच्या साडे सतरा कोटी रुपयांच्या प्रस्तावित बांधकामास लवकरच सुरूवात करण्याचा विद्यापीठाचा मानस असून सदर महाविद्यालय उत्कृष्ट दर्जाचे तयार होणार असल्याची माहिती कुलगुरूंनी याप्रसंगी दिली. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरीता निश्चितच मदत होईल तसेच या भागात उच्च शिक्षणाच्या सुविधा व दर्जा उंचविण्यास सुद्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर महाविद्यालयाच्या प्रस्तावित बांधकामाच्या साडे सतरा कोटी रूपयांच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरात मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती याप्रसंगी होती. आमदार संजय गायकवाड यांनी मॉडेल डिग्री कॉलेजसंदर्भात शासनाकडून सर्व प्रकारची मदत शासनाकडून मिळण्याकरिता सर्व प्रयत्न केल्या जातील तसेच या महाविद्यालयाला मुख्य रस्त्यांपासून असलेला रस्ता आमदार निधीतून बांधून देणार असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले.
या विभागाच्या विकासाकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी याप्रसंगी कौतुक केले.