डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील-अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सेवागौरव संपन्न
सेवक कल्याण निधीची स्थापना करणार
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी यांना अडीअडचणीच्या वेळी आकस्मिक खर्चाची आवश्यकता पडते. त्यासाठी ‘सेवक कल्याण निधी’ची स्थापना करण्यात येईल. कुलगुरुंपासून, शिक्षक, अधिकारी व चतुर्थश्रेणी श्रेणी कर्मचारी या निधीसाठी योगदान देतील, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जून अखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्यां अधिकारी, कर्मचारी यांचा सेवागौरव कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली आला. महात्मा फुले सभागृहात शनिवारी (दि २९) कार्यक्रम झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, सामान्य प्रशासनचे अधिकारी डॉ कैलास पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ ईश्वरसिंह मंझा, वरिष्ठ सहाय्यक अप्पासाहेब नारायण वाणी व प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ मच्छिंद्र रावसाहेब जगदाळे यांचा सेवागौरव करण्यात आला.
यावेळी कुलगुरु डॉ विजय फुलारी म्हणाले, विद्यापीठात सध्या शिक्षक – कर्मचारी याची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे निवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना ’मानसेवी’ तत्वावर नियुक्ती करण्यात येईल. तसेच ऑगस्ट महिण्यापासून ’सेवा कल्याण निधी’ स्थापन करण्यात येईल. दोन्ही ठराव येत्या व्यवस्थापन परिषदेत ठेवण्यात येतील, असेही कुलगुरु डॉ विजय फुलारी म्हणाले. उपकुलसचिव डॉ ईश्वरसिंह मंझा यांनी आपल्या सेवेतील विविध अनुभव विशद केले. परिपत्र, परिनियम, अध्यादेश, विद्यापीठ कायदा, शासनादेश आदींचा निट अभ्यास करुन अधिकारी, कर्मचारी यांनी काम करावे, अशी अपेक्षाही डॉ मंझा यांनी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवसीय रजा रोखीकरणाची संपुर्ण रक्कम मिळावी, कर्मचारी भरती व्हावी, अशी अपेक्षाही डॉ कैलास पाथ्रीकर यांनी व्यक्त केली. डॉ गणेश मंझा यांनी सूत्रसंचालन तर भरत वाघ यांनी आभार मानले. प्रारंभी तीनही जणांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व दोन लाखांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
उपकुलसचिव डॉ ईश्वरसिंह मंझा यांनी ऊमटविला ठसा
उपकुलसचिव डॉ ईश्वरसिंह मंझा
२१ वर्ष सेवेच्या काळात सहाय्यक कुलसचिव, उपकुलसचिव पदावर कार्य केले आहे. शैक्षणिक विभाग, परीक्षा, पदव्यूत्तर विभाग, सामान्य प्रशासन, धाराशिव उपपरिसर आदी ठिकाणी त्यांनी उपकुलसचिव पदी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. विद्यापीठ कायद्याचे सखोल ज्ञात असलेला अधिकारी म्हणून डॉ मंझा यांची ओळख आहे. आज सत्काराला उत्तर देताना अत्यंत मनमोकळेपणाने त्यांनी आपले मुद्दे मांडले. काही वेळ ते सद्गगदित झाले होते.