डॉ हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात कृतज्ञता कार्यक्रम
कोल्हापूर : दिव्यांग आणि दृष्टीव्यंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी येथे सांगितले. शिवाजी विद्यापीठातील समावेशी शिक्षण संसाधन केंद्र आणि यु जी सी स्कीम फॉर पी डब्ल्यू डी यांच्या वतीने आज ‘कृतज्ञता हेलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत मान्यवरांसह स्वयंसेवकांना ब्रेलची प्रात्यक्षिके देण्यात आली.
दिव्यांग व्यक्तींमध्येही अनेक प्रकारच्या क्षमता असतात, त्या लक्षात घेऊन त्यांना प्रेरित करण्याची आवश्यकता प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली. कुलसचिव डॉ विलास शिंदे यांनी हेलर केलर यांच्या कार्याचे महत्त्व विषद केले.
या प्रसंगी सतीश नवले यांनी मान्यवरांसह स्वयंसेवकांना ब्रेल लिपीचे धडे प्रात्यक्षिकासह दिले. यावेळी सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अक्षदा बिराजदार, ऋतुजा जाधव, मयुरी वाघमारे, अश्विनी सरोदे, तृप्ती इंगळे, रत्नावली, अक्षय जहागीरदार, अनिल मकर आदींचा समावेश होता. समन्वयक डॉ प्रतिभा देसाई यांनी प्रास्ताविक केले. संगीत विभागाच्या माजी अधिविभाग प्रमुख डॉ अंजली निगवेकर यांनी स्वागत केले.