विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अमरावती विद्यापीठात होणार मंथन
विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची ३०जून पर्यंत नावे पाठविण्याचे विद्यार्थी विकास विभागाचे आवाहन
अमरावती : विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी, समस्यांबाबत विद्यापीठ प्रशासन गांभिर्याने विचार करीत असून विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी, नवीन शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या असलेल्या विविध योजना आदींसंदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात लवकरच विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात येणार आहे.
या सभेत चर्चा, संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांवर विचारमंथन करुन मार्ग काढला जाईल. त्यामुळे विद्यापीठ परिक्षेत्रात येणाऱ्या पाचही जिल्ह्रांमधील नोंदणीकृत विद्यार्थी संघटनांनी आपल्या दोन प्रतिनिधींची नावे, संपूर्ण पत्त्यासह, संपर्क क्रमांक, इ-मेल संघटनेच्या लेटर हेडवर संचालक, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडे दि ३० जून, २०२४ पर्यंत पाठवावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ राजीव बोरकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधितांना तातडीने डॉ राजीव बोरकर यांना प्रत्यक्ष किंवा संपर्क क्र ८८५५०८३९६४ वर संपर्क साधता येईल.