अमरावती विद्यापीठात विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे कुलगुरुंच्या हस्ते उद्घाटन
विद्यापीठस्तरीय शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालकांच्या कार्यशाळेचे कुलगुरुंच्या हस्ते उद्घाटन
क्रीडाकौशल्य विकासासाठी विद्यापीठ सदैव तत्पर – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सदैव तत्पर असून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता विकास, पोषक वातावरण निर्मितीसाठी सातत्याने विद्यापीठाचे प्रयत्न सुरूच आहेत, असा दृढ विश्वास अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी व्यक्त केला. विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने तीन दिवसीय शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालकांच्या विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून व्य प सदस्य डॉ तनुजा राऊत, एन एस एस एम महाविद्यालय, नागपुरचे माजी प्राचार्य डॉ अरविंद करवंदे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ सुभाष गावंडे उपस्थित होते.
डॉ तनुजा राऊत म्हणाल्या, अशाप्रकारच्या कार्यशाळेचे गेल्या तीन वर्षांपासून आयोजन करणारे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ महाराष्ट्रात एकमेव असे विद्यापीठ आहे. डॉ सुभाष गावंडे म्हणाले, पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दैनिक भत्त्यामध्ये विद्यापीठ वाढ करणार आहे. क्रीडाविषयी विद्यापीठात पोषक वातावरण तयार होत असून क्रीडा सुविधेच्या दृष्टीने मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम सुरू आहे. यासाठी 13 कोटी रुपयांचा निधी सुध्दा मिळाल्याचे त्यांनी सांगून यासाठी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ शिरीष टोपरे यांनी, तर आभार डॉ राजेश चंद्रवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शारीरिक शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले. कार्यशाळेमध्ये विद्यापीठ संलग्नित 80 शारीरिक शिक्षण संचालकांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यशाळेमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच शारीरिक शिक्षण व क्रीडाकौशल्याची सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.