डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना पदव्यूत्तर विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त बुधवारी (दि २६) अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ शशांक सोनवणे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी केंद्राच्या संचालक डॉ निर्मला जाधव या होत्या. तर राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनातही तैलचित्रास संचालक डॉ भारती गवळी यांनी पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी बोलताना प्रा सोनवणे म्हणाले, आरक्षण धोरणाची सुरुवात करणारे देशातील सर्व प्रथम राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आरक्षण, स्त्रियांवरील हिंसाचार विरोधी कायदे व माणूस म्हणून अनेक संवेदनशील कायद्यांची निर्मिती करणारे राजर्षी शाहू अशी ओळख म्हणून शाहू महाराज आज फार कमी लोकांना ठाऊक आहेत याची खंत वाटते. भारतीय इतिहासात सामानतेचे बीज केवळ बोलून निर्माण होणार नाहीं तर त्यासाठी कडक कायद्यांची निर्मिती लोकराजा राजर्षी शाहू यांनी केली. आणि म्हणूनच त्यांचे विचार व कार्य आजच्या पिढीने व आपण सर्वांनीच आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रा. सोनवणे यांनी केले.
याप्रसंगी डॉ अश्विनी मोरे यांनी देखील राजर्षी शाहू महाराज यांच्या योगदानाविषयी मांडणी केली. डॉ सविता बहिरट यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या मुलामुलींच्या सह-शिक्षणाच्या धोरणाविषयी मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप डॉ निर्मला जाधव यांनी केला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, कुठल्याही महान व्यक्तींची जयंती व स्मृतीदिनानिमित्त केवळ हारतुरे वाहने महत्वाचे नाहीं तर या महान व्यक्तींच्या विचार व कार्याला समजून घेऊन तो विचार आत्मसात करून आपल्या जीवनाची वाटचाल आपण केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या महापुरुषांना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजर्षी लांडगे यांनी तर आभारप्रदर्शन अर्पिता शेजवळ यांनी केले. याप्रसंगी केंद्रातील डॉ विकास टाचले व संजय पोळ उपस्थित होते.