आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांसमवेत ऑनलाईन बैठक संपन्न
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ उन्हाळी व हिवाळी सत्रातील वैद्यकीय पदवी (MBBS), वैद्यकीय पदव्युत्तर पदवीका/वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (PG Diploma /DM/ M Ch) आणि वैद्यकीय पदव्युत्तर या सर्व अभ्यासक्रमातील विद्यापीठाच्या लेखी परीक्षा वेळापत्रकात एक दिवस आड अशा पध्द्तीने वेळापत्रक तयार करुन परीक्षा संपन्न होतात. परंतु राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या शैक्षणिक दिन दर्शिकेनुसार या अभ्यासक्रमाच्या लेखीव प्रात्यक्षिक परीक्षा एका महिन्याच्या आत घेण्यात याव्या असे निर्देशीत असल्याने परीक्षा मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चान्वये विद्यापीठातर्फे हिवाळी सत्र 2024 पासून या परीक्षा एक दिवसाची सुट्टी न देता सलग घेण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते.
याबाबत विद्यार्थ्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कुलगुरु डॉ माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांसोबत झुम मिटींग द्वारे संवाद साधला. या दरम्यान एक दिवस आड परीक्षा घेणेबाबत ऑनलाईन मतदान प्रक्रिया (Opinion Poll) राबवली असता बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा एक दिवस आड परीक्षा घ्यावी असा दिसून आला. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पूर्वीप्रमाणेच एक दिवस आड परीक्षा घेणेबाबत सहमती झाली.
या ऑनलाईन संवादामध्ये प्रति-कुलगुरु प्रा डॉ मिलिंद निकुंभ, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ विठ्ठल धडके, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, तसेच संबंधीत विद्यार्थी उपस्थित होते. तसेच उपरोक्त बाब आगामी होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीसमोर चर्चेसाठी सादर करण्याचे ठरले, असे कुलगुरु डॉ माधुरी कानिटकर यांनी स्पष्ट केले.