राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परिसर मुलाखत
-भंडारा येथील महर्षी विद्या मंदिराने घेतल्या मुलाखती
नागपूर , १५ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॅम्पस इंटरव्यू आयोजित करण्यात आले. विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील मानवविद्या विद्या शाखा येथे भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर यांच्या वतीने शनिवार, दिनांक १५ जुलै २०२३ रोजी या मुलाखती घेण्यात आल्या.
शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने रोजगार व प्रशिक्षण सेल सुरू केला. कुलगुरूंच्या मार्गदर्शनात विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग त्याचप्रमाणे संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या विभागाच्या मार्फत विविध रोजगार मेळाव्यांमधून रोजगार प्राप्त होत आहे. भोपाळ येथील महर्षी शिक्षण संस्थेच्या वतीने भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर ही शाळा संचालित आहे. या संस्थेच्या वतीने राज्यात भंडारा वर्धा यवतमाळ तुमसर व गोंदिया येथे अशा पाच ठिकाणी शाळा सुरू करण्यात आले आहे. भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर करीता पीजीटी आणि टिजीटी या पदाकरिता विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. महर्षी विद्या मंदिराच्या प्राचार्य श्रुती ओहळे, उपप्राचार्य भाग्यश्री शिवणकर, शिक्षक प्रमोद नागपुरे यांच्याकडून घेण्यात आल्या. यावेळी रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन व प्रवीण टाकसाळे उपस्थित होते. या पदाकरिता ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सुरुवातीला विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या. शिक्षक पदाकरिता या विद्यार्थ्यांची निवड संस्थेकडून केली जाणार आहे.