हिंदी विश्वविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
दैनंदिन जीवनात योगाचा सराव करावा – कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात 10 व्या विश्व योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह म्हणाले की योगामुळे जगामध्ये भारताची शान वाढली आहे. योग आपल्या प्राचीन परंपरेपासून चालत आलेला आहे. योगाने भारतीय जीवनाच्या संस्कृतीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गीतेमध्ये सांगितलेल्या कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाशी आपण सर्व परिचित आहोत. ते म्हणाले की योग प्रत्येकाला जोडण्याचे काम करतो. व्यक्तीला समाजाशी जोडण्यासाठीही योग महत्वाचे साधन आहे. योगासनाशिवाय कार्यक्षमता शक्य नाही. कुलगुरू म्हणाले की दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करून त्याचा नियमित सराव केला पाहिजे.
कुलसचिव व कार्यक्रमाचे संयोजक प्रो आनन्द पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना योग हा कर्माच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचे सांगितले. योगाद्वारे योग्यता प्राप्त होते. कार्यक्षमतेसाठी योग आवश्यक आहे. योग समजून घेतल्याशिवाय योग्यता संपादन करता येत नाही. सध्याच्या भौतिकवादी समाजात आपली जाणीव जागृत करायची असेल, तर त्यासाठी योग आवश्यक आहे. आपण योगाला जोडणारा म्हणून पाहिले पाहिजे. ते म्हणाले की योग हे गतिशीलतेचे नाव आहे. योग हा बोलण्याचा कमी आणि कृतीचा जास्त विषय आहे.
यावेळी योगतज्ज्ञ म्हणून आमंत्रित संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सहायक प्राध्यापक आदित्य पुंड, प्रयोग निस्ताने आणि भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची योगासने व प्राणायाम करण्यात आले. यावेळी वित्त अधिकारी पी सरदार सिंह आणि अतिथी म्हणून त्रिपुरा केंद्रीय विश्वविद्यालय, आगरतळा येथील वरिष्ठ राजभाषा अधिकारी डॉ मुनीन्द्र मिश्र आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, गोवाचे उपनिदेशक डॉ राकेश कुमार शर्मा हे मंचावर उपस्थित होते.
शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी ७ वाजता विश्वविद्यालयाच्या मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावर्षी योग दिनाचा मुख्य विषय ‘स्वतः आणि समाजाकरीता योग’ हा होता. योग दिनाची सुरुवात विश्वविद्यालयाच्या कुलगीताने आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी बी एस मिरगे यांनी केले तर जनसंचार विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ राजेश लेहकपुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सह-संयोजक म्हणून सहायक प्रो डॉ अनिकेत आंबेकर यांनी भूमिका निभावली. यावेळी विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.