यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे बुधवार, दि १९ जून २०२४ रोजी ‘Reshaping Education : Today & Tomorrow’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ जयदीप निकम, प्रा राम ताकवले संशोधन केंद्र व स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंगच्या संचालक इमरटस प्रा कविता साळुंके, विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे संचालक प्रा व्ही बी गायकवाड, बहाई अकॅडमी, पाचगणीचे संचालक डॉ लेसन आझादी, सर्व विद्याशाखा, विभाग व केंद्रांचे संचालक, प्राध्यापक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा कविता साळुंके यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यापीठाची भूमिका, शिक्षण व्यवस्थेत येणाऱ्या नवीन प्रवाहांची माहिती, समाजातील सर्व घटकांच्या शिक्षणातील समावेशात मुक्त विद्यापीठाची भूमिका, भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित अभ्यासक्रमाची निर्मिती, कौशल्याधारित नवीन शिक्षणक्रमांची निर्मिती व या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रांची जबाबदारी यासंदर्भात कुलगुरूंनी मार्गदर्शन केले.
परिसंवादाच्या पहिल्या सत्रात प्रा राम ताकवले संशोधन केंद्र व स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंगच्या संचालक प्रा कविता साळुंके यांनी सर्वांना स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंगची ओळख करून माहिती दिली. दुसऱ्या सत्रात प्रा व्ही बी गायकवाड यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या प्राप्त करण्याच्या धोरणासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
परिसंवादाच्या तिसऱ्या व अंतिम सत्रात बहाई अकॅडमीचे संचालक डॉ लेसन आझादी यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व बहाई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत असलेल्या Value Education : Fundamental व Becoming a Global Citizen या दोन शिक्षणक्रमांबद्दल सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
सदर परिसंवादामध्ये विद्यापीठाच्या नाशिक, अमरावती व नागपूर विभागीय केंद्रांतर्गत असणाऱ्या अभ्यासकेंद्रांमधून १६७ प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या परिसंवादाच्या आयोजनासाठी प्रा कविता साळुंके यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले व प्रा राम ताकवले संशोधन केंद्र व स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंग मधील सर्व कर्मचाऱ्यांनी या परिसंवादाच्या आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विद्या बागुल यांनी केले, तर प्रमुख पाहूण्यांची ओळख डॉ वसुदेव राऊत, डॉ सचिन पोरे, हरिष काळे यांनी करून दिली. सदर परिसंवादांचे संगमनेर व पुणे येथे देखील आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी दिली.