शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन जर्नालिझम, शॉर्ट फिल्म, फोटोग्राफी कोर्ससाठी प्रवेश सुरू
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या पी जी डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्टफिल्म मेकिंग आणि सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंन्ट्री फोटोग्राफी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 30 जूनपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील.
हे तिन्हीही अभ्यासक्रम पार्टटाईम आहेत. इतर कोणताही पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकत असताना हे तिन्हीही कोर्स करता येतात. विद्यापीठात फक्त शनिवार आणि रविवारी या कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. नोकरी किंवा पूर्णवेळ व्यावसाय करत असतानाही हे कोर्स करता येतात. या तिन्हीही कोर्ससाठी वयाची कोणतीही अट नाही. पी जी डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम हा पदवीनंतरचा एक वर्षाचा कोर्स असून सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्टफिल्म मेकिंग आणि सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंन्ट्री फोटोग्राफी हे दोन्ही कोर्स तीन महिन्यांचे असून ते बारावीनंतर करता येतात.
या तिन्हीही कोर्ससाठी अध्यासनात संगणक लॅब, विविध सॉफ्टवेअर्स, कॅमेरे, डिजिटल स्टुडिओ यासह अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/#/login या लिंकवर जावून नोंदणी करावी. यासंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनात संपर्क करावा, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ शिवाजी जाधव यांनी केले आहे.