आरोग्य विद्यापीठात विद्यार्थी कल्याणकारी योजना संदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

महाविद्यालयांनी विद्यार्थी केंद्री योजना सक्षमरित्या राबवाव्यात

कुलगुरु लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

नाशिक : महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना व्यापक दृष्टीकोन ठेऊन सक्षमतेने राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची संलग्नीत महाविद्यालयातील प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ वाय प्रविणकुमार, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ देवेंद्र पाटील, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यार्थी हा केेंद्रबिंदु मानून विद्यापीठाने अनेक विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. गेल्या दोन वर्षात पारंपारिक योजनांबरोबर अनेक संशोधनाला उपयुक्त ठरतील अश्या उपक्रमांना प्रारंभ केला आहे. यामध्ये अधिक पारदर्शकता असावी यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन नवे प्लॅटफॉर्म संलग्नित महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.

विद्यार्थी कल्याणकारी योजनांसाठी विद्यापीठाकडून अर्थसंकल्पात मोठया प्रमाणात तरतूद करण्यात येते मात्र योजनांची माहिती नसल्याने गरजू विद्यार्थी योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. योजनांची माहिती देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने डिजिटल लायब्ररी सुरु केली आहे, याच्या माध्यमातून विविध जर्नल्स, पुस्तके व संदर्भग्रंथ विद्यर्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात.

त्या पुढे म्हणाल्या की, तरुण वयात मानसिक ताण-तवाणाचे प्रमाण वाढत आहे यासाठी ‘मानस’ ऍप विकसित करण्यात आले आहे. लवकरच विद्यापीठातर्फे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट समुपदेशनासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यानी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.

Advertisement

याप्रसंगी प्रति- कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या विविध योजना व उपक्रमांविषयी विद्यार्थ्यामध्ये संवेदशीलता जागृत करणे गरजचे आहे. विद्यार्थी कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील विभागीय स्तरावर मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात याव्यात. विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे व त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले की, महाविद्यालयांनी विद्यार्थी व विद्यापीठ यांच्यामधील समन्वय अधिक विकसित करणे गरजेचे त्यांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मदत होईल असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी विद्यापीठाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. यामध्ये बहिःशाल शिक्षण मंडळ योजनेत व्यक्तीमत्व विकासाला चालना देण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कमवा व शिका योजनेत विद्यार्थ्यांने अभ्यास तासिकेव्यतिरिक्त दोन तास नेमुन दिलेले काम केल्यास त्यांना आर्थिक स्वरुपात रक्कम देण्यात येते. सावित्रीबाई फुले मुलींकरीता शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात येते.

धन्वंतरी विद्याधन योजनेत शैक्षणिक कर्जाचे वाटप करण्यात येते तसेच संजिवनी विद्यार्थी सुरक्षा योजनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास पालकांना दोन लाख रुपये अनुदान किंवा गंभीर आजार, अपघातात दुखापत झाल्यास दहा हजार रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत सी-डॅक युनिटच्या प्रतिनिधी अनुपमा गायकवाड यांनी ऑनलाईन बोर्डीग सॉफ्टवेअर संदर्भात विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यापीठाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेस राज्यातील संलग्नित महाविद्यालयातील सुमारे 450 पेक्षा अधिक अधिष्ठाता, प्राचार्य, समन्वयक, लिपिक मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page