शिवाजी विद्यापीठात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास प्रारंभ
कोल्हापूर : २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या सुविधेसाठी तंत्रज्ञान अधिविभागांमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास प्रारंभ करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थी व पालक यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जात आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी म्हणजे काय, अभ्यासक्रमाचे स्वरूप, विविध शाखा, शाखांची निवड कशी करावी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्या अनुषंगाने होणारे बदल , भविष्यात असणाऱ्या रोजगार संधी, उच्च शिक्षणाच्या संधी, विविध स्कॉलरशिप, विद्यापीठाच्या विविध योजना, सीमा भागातील मुलांच्यासाठी फी सवलत व मोफत वसतिगृह योजना याविषयी समग्र मार्गदर्शन केले जाते.
तसेच लागणारी कागदपत्रे व प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप याविषयीची माहिती देऊन शंकांचे निरसन केले जाते. या प्रवेश प्रक्रिया केंद्रात दिवसभर मार्गदर्शक प्राध्यापक उपलब्ध असतात. विद्यार्थी व पालकांना त्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. अनेक विद्यार्थी व पालक या केंद्रास भेट देत आहेत. तंत्रज्ञान अधिविभागामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रामधील विविध शाखांचे शिक्षण दिले जाते. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीरिंग,सिव्हिल इंजिनीरिंग आणि मेकॅनिकल इंजिनीरिंग या शाखांचा समावेश आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी, एनव्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे.
सर्वांनी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा डॉ एस एन सपली यांनी केले. अधिक माहितीसाठी ०२३१२६०९४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.