शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात नाट्य कार्यशाळेला सुरवात
कोल्हापूर : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठातर्फे दिनांक २९ मे ते ३१ मे २०२४ या कालावधीत सकाळी १०:३० ते दु २:०० वाजेपर्यंत नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्र विभागप्रमुख डॉ विनोद ठाकूरदेसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ संजय तोडकर, रविदर्शन कुलकर्णी, डॉ राजश्री खटावकर, राज पाटील, युवराज केळुसकर, विकास कांबळे हे नाट्य प्रशिक्षक उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेमध्ये अभिनय म्हणजे काय? दिग्दर्शनाची कार्यपद्धत, नाट्यलेखन विचार, रंगमंच तंत्राची ओळख अशा विषयांवर या तज्ञ शिक्षक-नाट्यकर्मींचे मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या कार्यशाळेसाठी अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून जवळ जवळ २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. राजापूर, मालवण, गडहिंग्लज, सांगली, कराड, कोल्हापूर या विविध ठिकाणाहून विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. आज पहिल्या दिवशी रविदर्शन कुलकर्णी यांनी मानवी जीवन आणि नाट्यकला, राज पाटील यांनी मराठी नाटकाचा इतिहास आणि रंगमंचीय खेळ यांवर प्रात्यक्षिकांसह कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.