महात्मा फुले कृषि विद्यापीठात रोजगाराच्या संधी व सायबर गुन्हे व सुरक्षीतता या विषयावर व्याख्यान संपन्न
कृषि क्षेत्राशी संबंधीत खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अमर्याद संधी – संशोधन संचालक डॉ सुनील गोरंटीवार
राहुरी : आजचे विद्यार्थी करीयर निवडतांना एम.पी.एस.सी. तसेच विविध सरकारी बँकांचा पर्याय यांची निवड करतात. परंतु त्यामध्ये सर्वच विद्यार्थी यशस्वी होत नाहीत. त्याला मर्यादाही आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्राशी संबंधीत कंपन्यांचा पर्याय करीयरसाठी निवडावा. आज कृषि क्षेत्रामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्यामध्ये वेगळा विचार करणाऱ्या, जिद्दी तसेच असाधारन कौशल्याबरोबर कष्टाची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने रोजगार मिळू शकतो. विद्यार्थ्यांना करीयर करण्यासाठी कृषि क्षेत्राशी संबंधीत खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ सुनील गोरंटीवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील यांच्या सुचनेनुसार विद्यापीठातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करीयरच्या दृष्टीने महत्वाचे असणाऱ्या रोजगाराविषयी माहिती मिळण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे व्याख्याने आयोजीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर विद्यापीठातील डॉ नानासाहेब पवार सभागृहात पदव्युत्तर महाविद्यालय आयोजीत कृषि क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी व सायबर गुन्हे व सुरक्षीतता या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ सुनील गोरंटीवार बोलत होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव अरुण आनंदकर, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ विठ्ठल शिर्के, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ साताप्पा खरबडे, दिपक फर्टीलायझर व पेट्रोकेमिकल्स कार्पोरेशनचे माकेटींग विभागाचे माजी वरिष्ठ जनरल मॅनेजर सुरेश बांगर, राशी सीड्स प्रा ली चे व्यवसाय वृध्दी विभाग प्रमुख अनिल हिरेमठ, पुणे विभागाचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी तथा आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ महानंद माने, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ विजय पाटील व पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी डॉ बी एम भालेराव उपस्थित होते.
सुरेश बांगर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी पर्याय निवडतांना सरकारीपेक्षा खाजगी क्षेत्र निवडावे. यामध्ये तुमच्या अंगी असणाऱ्या कौशल्यांना न्याय देण्याचे पुरेपुर सामर्थ्य आहे. जगात सर्वात जास्त रोजगार देण्याचे सामर्थ्य या खाजगी क्षेत्राकडे आहे. याचा तुम्ही फायदा करून घ्या. काहितरी नविन व विशेष करण्याची तुमची स्वतःची तयारी असेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल.
तुम्हाला या क्षेत्रामध्ये भरपुर संधी उपलब्ध आहेत. अनिल हिरेमठ म्हणाले की विद्यार्थ्यांनी करीयरसाठी खाजगी क्षेत्राची निवड आव्हान म्हणुन स्वीकारावी. या क्षेत्रात दररोज काहितरी नवनविन घडत असते. हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेत पुर्ण तयारीनिशी उतरा. या क्षेत्रात अपयशाची भीती न बाळगता जर संपूर्ण आत्मविश्वासाने, अभ्यासपूर्ण, परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्यास भविष्य तुमचेच आहे. मोठी स्वप्ने पहा व ती पुर्ण करण्यासाठी विचारही तसेच करा. कुणाचीही कॉपी न करता स्वतःचा ब्रँड तयार करा असा उपदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केला. सर्जेराव बाबार यांनी यावेळी विविध सायबर गुन्हांसंबंधीची माहिती दिली. आपला पासवर्ड, ओटीपी तसेच इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार करतांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ विठ्ठल शिर्के यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बी एम भालेराव यांनी तर आभार डॉ विजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.