”बामु” विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजीला ‘एनबीए’चे मानांकन
-मानांकन मिळवणारा विद्यापीठातील पहिलाच विभाग
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील बी टेक (केमिकल) अभ्यासक्रमाला आगामी तीन वर्षासाठी ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडिटेशन’चे (एनबीए) मानांकन प्राप्त झाले आहे. सदर मानांकन मिळविणारा विद्यापीठातील पहिला विभाग आहे, अशी माहिती विभागप्रमुख तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ भगवान साखळे यांनी दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘केमिकल टेक्नॉलॉजी’ विभाग हा गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. या अंतर्गत बी टेक व एम टेक या अंतर्गत फुड टेक्नॉलॉजी व केमिकल टेक्नॉलॉजी यासह पदवी व पदव्यूत्तर असे सहा अभ्यासक्रम सुरु आहेत. केंद्र शासनाच्या धोरणानुसार अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांना राष्ट्रीय दर्जाची मानके ठरविण्यात आली आहेत. त्या नुसार भारतीय अधिस्वीकृती परिषदेचे मानांकन मिळवण्यासाठी विभागाने प्रयत्न सुरू केले.
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यात पाच ते सात एप्रिल या काळात विभाग गेल्या ‘एनबीए’ला सामोरा गेला. विभागप्रमुख डॉ भगवान साखळे, डॉ प्रवीण वक्ते यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी यासाठी मेहनत घेतली. मानांकन मिळाल्याचे पत्र शुक्रवारी (दि २४) प्राप्त झाले. यानंतर सर्वानी कुलगुरू यांची भेट घेतली. तसेच गेल्या वर्षी ‘फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया’ने एम फार्म-फार्मास्युटिक्स व क्वालिटी अॅश्यूरन्स हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमास प्रत्येकी १२ जागा असणार आहेत. या विभागाचे वोखार्ड रेडीज लॅब, अर्पना फार्मा आदी कंपन्यांशी करार झालेले आहेत. ‘मास्टर ऑफ फार्मसी’ या कोर्सचे उदघाटन गेल्यावर्षी डिसेम्बरमध्ये करण्यात आले.
मानांकन मिळविणारा पहिला विभाग
छत्रपती संभाजीनगर ही फार्मा हब असून विद्यार्थ्यांना मोठ्या संधी आहेत. त्यामुळे या कोर्सच्या उत्तम भवितत्व आहे. अत्यंत उत्तमरितीने हे कोर्स चालवण्यिात येतील, अशा सूचना मा.कुलगरु डॉ.विजय फुलारी यांनी दिल्या आहेत. तसेच विभागप्रमुख व सर्व सहकारी प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम डी शिरसाठ, विभाग प्रमुख डॉ.भगवान साखळे, डॉ प्रवीण वक्ते, फॉरेन्सिक सायन्स विगप्रमुख डॉ भास्कर साठे तसेच विभागातील प्रा विनय लोमटे, डॉ गणेश पांढरे, डॉ सचिन भुसारी, डॉ विवेक राठोड, डॉ गौरी कल्लावार यांची उपस्थिती होती. या विभागास शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकनात (Triple A) देखील ‘ए प्लस’ दर्जा प्राप्त झालेला आहे.
प्रारंभी विभागाच्या वतीने कुलगुरूंचा स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विभागाला कुलगुरू, प्रकुलगुरु व कुलसचिव हे तिन्ही पदे मिळाली तसेच फार्मसी हा कोर्स सुरू झाला. आता ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडिटेशन’चे (एनबीए) मानांकन प्राप्त झाले. सदर मानांकन मिळविणारा विद्यापीठातील पहिला विभाग ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया डॉ भगवान साखळे यांनी व्यक्त केली. तर केमिकल टेक्नॉलॉजी विभागाला आगामी तीन वर्षासाठी ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडिटेशन’चे (एनबीए) मानांकन प्राप्त झाले आता नॅक मूल्यांकनासाठी उत्तम काम करणे गरजेचे आहे, असे कुलगुरू डॉ विजय फुलारी म्हणाले.