एमजीएम विद्यापीठात नि:शुल्क संगीत नाट्य कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित संगीत व नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवार, दिनांक १४ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता रुक्मिणी सभागृह येथे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी हार्मोनियम आणि कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी पकवाज वाजवून स्वरनाद करीत उद्घाटन केले.
यावेळी, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ विलास सपकाळ म्हणाले, एमजीएम विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आले आहे. या दहा दिवसीय मोफत कार्यशाळेत सुगम गायन, वाद्य संगीत, नाटकाच्या इतर तांत्रिक बाजूवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेमध्ये विद्यार्थी आपले छंद जोपासत विद्यापीठाचा भाग बनू शकतात. विद्यापीठात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम एकाच वेळी शिकण्याची संधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नृत्य, संगीत, नाटक, गायन, वादन, अशा विविध प्रकारच्या कलांचे नि:शुल्क प्रशिक्षण एमजीएम विद्यापीठ गतवर्षीपासून देत आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी आपली आवड जोपासत घडत आहेत. यावर्षी या कार्यशाळेला शहरवासीयांनी दिलेला प्रतिसाद निश्चितपणे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये नवीन काही शिकता येईल या उद्देशाने विद्यापीठाने ५० प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून या उपक्रमाससुद्धा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे कुलगुरू डॉ सपकाळ यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा डॉ राजू सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती हरदास यांनी केले तर आभार समन्वयक प्रा राहुल खरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतीश जोगदंड, वेदांत लोखंडे, बाबू गडलिंगे यांनी परिश्रम घेतले.