सौ के एस के महाविद्यालयात छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी

बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षिरसागर उर्फ काकू कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंदजी क्षीरसागर उपस्थित होते. ते म्हणाले की, वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी स्वराज्याचे युवराज तर 23 व्या वर्षी स्वराज्याचे छत्रपती झाले केवळ चौदाव्या व पंधराव्या वर्षी छत्रपती राजांनी साहित्य कविता त्यांच्या रस  घेतला आणि याच काळात छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित झाले.

बुद्धभूषण या संस्कृत ग्रंथासह इतर भाषेतील तीनही ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिले आहेत. शौर्य, धीरोदात्तपणा, क्षात्रतेज, निर्भिडता, प्रखर बुद्धिमत्ता अशा एक ना अनेक गुणांचा समुच्चय असणारे हे व्यक्तिमत्त्व राजकारण, समाजकारणाबरोबरच जगण्याचे आणि नातेसंबंधातील गुंतागुंतीचे अनेक पापुद्रे उलगडून दाखवते. म्हणूनच त्यांचे स्मरण आपल्याला विचार करण्यास भाग पाडते. अश्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो आणि सर्वाना शुभेच्छा देतो.

स्टाफ सेक्रेटरी डॉ दुष्यंता रामटेके यांची त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.

तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.

Advertisement

दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. औरंगजेबाने इ स १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.

मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही.

संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या ब्राम्हणांनी महाराजांशी दगाफटका केला.

शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. औरंगजेबाच्या कोणत्याच मोहाला आणि अटींना संभाजीराजे मान्य झाले नाहीत.. त्यांच्यापुढे झुकले हि नाहीत. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नर्क यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी एक तेजस्वी मशाल आपल्यातीलच दगाफटका, धोका किंवा गद्दारीने विझली. असे मत डॉ दुष्यंता रामटेके यांनी व्यक्त केले. तर आभार डॉ व्ही एम चौधरी यांनी मानले.

यावेळी पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ सतीश माऊलगे, कमावि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, डॉ व्ही टी देशमाने, डॉ गुट्टे, डॉ सोनाजी गायकवाड, प्रा सत्येंद्र पाटील, डॉ मंजुषा जाधव, डॉ शेळके आणि प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page