सोलापूर विद्यापीठाकडून विविध परीक्षांचा निकाल लागण्यास सुरुवात
एम एड अंतिम वर्षाचा निकाल 20 दिवसात जाहीर !
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एम एड अंतिम वर्षाचा निकाल अवघ्या वीस दिवसात जाहीर झाला आहे. परीक्षा पूर्ण झालेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांनी दिली.
कुलगुरू प्रा प्रकाश महानवर आणि प्र कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सुरुवातीला पदवी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. पूर्ण झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. सोमवारी एम एड अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. इतर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाची टीम कामाला लागली आहे.
सध्या पदव्युत्तर पदवी, एमबीए आणि अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा सुरू आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे मध्ये तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा जून महिन्यात पूर्ण होणार आहेत. परीक्षा झालेल्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांनी सांगितले.