सौ के एस के महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी
बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 10 मे रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर तो कर्माने श्रेष्ठ होत असतो, दक्षिण भागातील समाज हा अनेक रूढी परंपरा, अंधश्रध्दा, कर्मकांड, भेदभाव, जातीयता या मध्ये गुरूफटलेला होता. अशा परिस्थितीत समाजाला समानतेची शिकवणूक देण्याचे कार्य बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी केले.
महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरीबी व विविध प्रकारची विषमता दूर करण्यासाठी कायक वे कैलास आणि दासोह अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या व शारीरिक श्रमाचे महत्वही प्रतिपादीत केले. स्त्रियांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. प्रचलित सामाजिक व्यवस्थेत विधायक बदल घडवून आणण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांनी केलेले कार्य क्रांतीकारी असल्याने त्यांच्या कार्याकडे प्रबोधनकार या अर्थानेही पाहिले जाते.
कर्मचारी प्रतिनिधी डॉ दुष्यंता रामटेके यांनी महात्मा बसवेश्वर यांचे जीवन व्यक्तिमत्व व कार्यकर्तृत्वावर भाष्य केले. परिश्रमाचे, कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे स्त्री उध्दारक, अनुभव मंटपाच्या सहाय्याने महात्मा बसवेश्वरांनी कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माची मुक्ता करण्यासाठी तसेच त्याला व्यावहारिक व लोकशाही विश्वधर्माचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य केले आहे. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली म्हणूनच त्यांना विश्वगुरू, आद्य समाजसुधाकर, शरणरक्षक, महामानवतावादी, समतावादी लिंगायत धर्म पिता असे म्हणतात.
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ सतिष माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ नारायण काकडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.