शिवाजी विद्यापीठाच्या ‘स्कूल कनेक्ट अभियाना’स विद्यार्थी, पालकांचा उत्तम प्रतिसाद

बारावीनंतर विद्यापीठात शिकण्याची संधी विद्यार्थ्यांनी घ्यावी – कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०ची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात येत असून या धोरणाच्या अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतर पदवी स्तरावरील अनेक अद्यावत आणि महत्त्वाचे नवे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपली उज्ज्वल कारकीर्द घडविण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे शाहू स्मारक भवन येथे आयोजित स्कूल कनेक्ट कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ महादेव देशमुख, प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ विलास शिंदे आणि डॉ श्रीकृष्ण महाजन.

शिवाजी विद्यापीठातर्फे सन २०२४-२५ पासून बारावीनंतरचे अनेक पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी विद्यापीठाने आज दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विशेष ‘स्कूल कनेक्ट अभियाना’चे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ शिर्के बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

कुलगुरू डॉ शिर्के म्हणाले, विद्यापीठामधील बारावीनंतरचे अभ्यासक्रम हे अन्य महाविद्यालयीन अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांना त्यांच्या रुपाने अत्यंत सक्षम पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत शिवाजी विद्यापीठ नवीन व अद्यावत अभ्यासक्रम सुरू करीत आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतरचे बीए स्पोर्ट्स, बीए फिल्म मेकिंग, बीकॉम बँकिंग अँन्ड फायनान्स, बीएस्सी – एमएस्सी इकॉनॉमिक्स (पाच वर्षे एकात्मिक), बीसीए, बीएस्सी – एम एस्सी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग), बीएस्सी – बीएड (चार वर्षे एकात्मिक) आणि एमबीए (एकात्मिक चार वर्षे) हे अभ्यासक्रम सुरू करीत आहे. विद्यापीठाच्या ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फतही ऑनलाईन एमबीए सह इतरही अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांची माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या हरित, प्रदूषणविरहित, पर्यावरणपूरक वातावरणात बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्यांना उच्चविद्याविभूषित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यातील अनेक प्राध्यापक आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिकप्राप्त आहेत. थेट विद्यापीठात प्रवेश घेण्याचे अनेक लाभ विद्यार्थ्यांना मिळतात. दर्जेदार पायाभूत सुविधा, अत्याधुनिक संशोधन सुविधांनी सज्ज प्रयोगशाळा, डिजीटल क्लासरुम यांसह सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकासाच्या क्रीडा, कला सुविधा व स्पर्धासंधीही त्यांनी उपलब्ध होतात.

यावेळी डॉ पी जी पाटील (बीएस्सी – एमएस्सी – नॅनोसायन्स व तंत्रज्ञान), डॉ कबीर खराडे (बीसीए आणि बी एस्सी – एम एस्सी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग), डॉ महेश साळुंखे (बीटेक), डॉ विद्यानंद खंडागळे (बीएस्सी – बी एड), डॉ ज्ञानदेव तळुले (बी एस्सी – एम एस्सी इकॉनॉमिक्स), डॉ शिवाजी जाधव (बीए फिल्म मेकिंग), डॉ शरद बनसोडे (बीए – स्पोर्ट्स), डॉ आण्णासाहेब गुरव (बीकॉम बँकिंग अँड फायनान्स) व एमबीए (४ वर्षे एकात्मिक) आणि डॉ सुशांत माने यांनी ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्राच्या बीए व बीकॉम अभ्यासक्रमांबाबत माहिती देऊन शंकासमाधान केले.

कार्यक्रमात सुरवातीला मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या अनुषंगाने उपस्थितांना अवगत केले. अभिजीत लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ विलास शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page