संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘प्रारंभ’ कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न
नोकरी घेणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : नोकरी घेणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असे आवाहन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन व इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेस च्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी “प्रारंभ” नामक प्रभावी कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र इंडस्ट्रियल असोसिएशनचे सचिव आणि विद्यापीठ सिनेट सदस्य आशिष सावजी, इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेसच्या संचालक प्रो स्वाती शेरेकर, यंग इंटरप्रेनर जमीन शहा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी आशिष सावजी मार्गदर्शन करतांना म्हणाले, महाराष्ट्र इंडस्ट्रियल असोसिएशन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील.विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना याव्या, याकरिता अशाप्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. इंटरप्रीनर जैमिन शहा यांनी स्टार्ट अप्समध्ये येणारे अडथळे व ते कसे दूर करता येईल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना देणे, उद्योजकतेला प्रोत्साहन, नवीन कल्पनांना आकार देऊन पुढे नेणे, कंपनी निर्माण करणे, पेटंट करणे, आर्थिक सहाय्य अशा प्रकारची विविध मदत इन्क्युबेशन सेंटरद्वारे करण्यात येते.
कार्यक्रमामध्ये कॉल फॉर प्री-इन्क्युबेशनद्वारे विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना निवडण्यात आल्या व त्यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. “वूमन लेड आयडियाथॉन 2024” च्या आयोजनातून महिलांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोग्य, स्वच्छता, आत्मरक्षा, महिलांसाठी तंत्रज्ञान, कायदेशीर मदत उद्योजकता यासारख्या विविध विषयांवर महिलांनी सादर केलेल्या कल्पनांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कन्सोलेशन प्राईससाठी वैशाली वानखडे यांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक सीमा राठोड, दुसरा क्रमांक मृणाली, तिसरा क्रमांक आकांक्षा रामटेके यांना मिळाला.
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन स्टुडंट चॅलेंजमध्ये निवडण्यात आलेल्या ज्ञानेश्वर कापसे, डॉ अक्षय जोशी, खुशाल राठोड, सार्थक कदम, शहाजी तिडके, सृष्टी पडोळे, सार्थक ठाकरे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सेंटरच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून इनोव्हेशन इनक्युबेशन अँड लिंकेजेसच्या संचालक प्रो स्वाती शेरेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद यादव, अमोल हिरुळकर, नरेश मोवळे, रविकुमार ढेंगळे यांनी अथक परिश्रम घेतले.