शहरातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी एमजीएम विद्यापीठाचा अभिनव उपक्रम
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ध्वनी प्रदूषण कमी व्हावे यासाठी एमजीएम आणि शहर पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर एकत्रित करून ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृतीपर संदेश देणारी एक कलाकृती तयार करून शहरातील प्रमुख चौकात उभारली जाणार आहे.
कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर शहर पोलीस दलाकडून झालेल्या कारवाईतून संबंधित वाहन चालकांकडून जप्त करण्यात आलेले सायलेन्सर एमजीएम विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये जमा करण्यात आले आहेत. या जमा करण्यात आलेल्या सायलेन्सरवरती महाविद्यालयाचे यंत्र अभियांत्रिकीचे सहायक प्राध्यापक आकाश बारोटे व त्यांची टीम यावर काम करीत आहेत.
एमजीएम नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आले आहे. सायलेन्सर पासून तयार होणारी कलाकृती ही ध्वनी प्रदूषण रोखण्याचा संदेश देणारी असणार आहे. ही कलाकृती लवकरात – लवकर तयार करून शहरवासीयांना पाहण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचाही महत्वपूर्ण सहभाग राहणार असल्याची माहिती प्रा आकाश बारोटे यांनी यावेळी दिली.
पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शहर पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईतून संबंधित वाहन चालकांकडून जप्त करण्यात आलेले सायलेन्सर एमजीएम विद्यापीठाचे प्रा डॉ अरविंद चेल, प्रा डॉ एम एस कदम, प्रा आकाश बारोटे, किशोर मते, प्रशांत मुरमुडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.