जयंती विशेष : आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
जयंती विशेष : आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
January 3, 2020
Krantijyoti Savitribai Phule
” शिक्षणाची संधी मुलींना मिळाले पाहिजे….”
हा ध्यास घेऊन ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचविण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले.
३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील सत्यवती आणि खंडोबा नेवसे यांच्या पोटी सावित्रींचा जन्म झाला. १८४० साली ज्योतीबा फुलेंशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. ज्योतीबा फुल्यांनी शिक्षण घेत असताना सावित्रींना शिकवले. कर्मठ ब्राह्मणी व्यवस्थेने मुलींना शिक्षणाची कवाडे बंद केली होती. मुलींना शिक्षणाच अधिकार नव्हता. चुल आणि मुल या विकृत मनुवादी मानसिकतेमुळे मुली शिक्षणापासून वंचित होत्या. मुलींना शिक्षण घेता आले पाहिजे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे ज्योतिबांंना कळले होते. सावित्रींच्या शिक्षणाला कर्मठ ब्राम्हणांनी विरोध केला, परंतु ज्योतिबांनी त्याला न जुमानता शिक्षण दिले. १ जानेवारी १८४८ साली पुणे येथे भिडेवाड्यात मुलीची पहिला शाळा स्थापन केली. सावित्रीबाई भारतातील पहिल्या स्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या. सुरूवातीला शाळेमध्ये ६ मुली होत्या, परंतु १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४५ वर जाऊन पोहोचली. शाळेतील वाढती संख्या पाहून सनातन्यांनी विरोध सुरू केला. ते ‘धर्म बुडविला, जग बुडणार’ असे लोकांना सांगू लागले. सावित्रींच्या अंगावर शेण फेकले गेले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. परंतु सावित्री मागे हटल्या नाही. सनातनी कर्मठांच्या विरोधाला तोंंड देत शिक्षण प्रसाराचे काम चालू ठेवले. संघर्ष तीव्र होत गेल्यावर त्यांना घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. स्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंंनी ओळखले.
ब्राम्हण समाजात विधवा पुर्नविवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. जोतिबांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांच्या संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी कामे सावित्रीबाईंंनी निधडाने पार पाडली.
सत्यशोधक समाजाच्या कार्यात सावित्रीबाईंंचा मोठा सहभाग होता. ज्योतिबांंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे वाहिली. ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह त्यानी लिहिला. १८९६-९७ सालादरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचा जीव घेऊ लागला. यातून उध्दवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंंनी प्लेग पिडीतांसाठी पुण्याजवळ वसलेल्या सासणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाईंंना प्लेग झाला. त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्याचे निधन झाले.
सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी सुरू केलेले कार्य निरंतन चालू राहिले. सावित्रींंना अभिवादन करत असताना त्यांनी जे दलित, शूद्र आणि वंचितांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली. शिक्षणाचे महत्त्व जाणले. तीच परंपरा पुढे नेण्याचे कर्मवीर भाऊराव गायकवाड, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे आणि विविध छोट्या मोठ्या निस्वार्थी संस्थांनी केले. परंतु आज पुन्हा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांना शिक्षण नाकरणारी धोरणे राबवली जात असताना आपण जागे होण्याची गरज आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन राहिले नसून त्याकडे पैसा कमविण्याचे साधन म्हणून पाहिले जात आहे. शिक्षणाचा मांडलेला बाजार थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. बाजारू शिक्षणव्यवस्थेमुळे मुली शिक्षणापासून वंचित रहाण्याचे प्रमाण पुन्हा वाढणार आहे. गरीबांना शिक्षण नाकरणारे जाणारी धोरणे राबवली जात आहेत. शिक्षण घेणाऱ्या तरूण-तरूणींनी याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि वैज्ञानिक शिक्षण मिळण्यासाठी व्यवस्थेला निर्णय घेणे भाग पाडले पाहिजे. देशाच्या हितासाठी भावी पिढ्यांचे भवितव्य अंध:कार करणारे निर्णयाविरोधात एकजूट उभारूयात. सावित्रींंना अभिवादन करताना आपण याचा निश्चय करूयात !
नवनाथ मोरे
9921976460