डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची ३० एप्रिल पासून परीक्षा
चार जिल्हयात १२० केंद्र, ७४ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
अभियांत्रिकी, विधी व फार्मसी परीक्षा १५ मे पासून
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पदव्यूत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा येत्या ३० एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. चार जिल्हयात १२० केंद्रावर सुमारे ७४ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळांच्या संचालक डॉ भारती गवळी यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा दोन व १६ एप्रिल सुरळीतपणे सुरु आहेत. पदवी परीक्षेला एकूण दोन लाख ४७ हजार ७०९ विद्यार्थी आहेत. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात येत आहे.
तर आता तिसऱ्या टप्प्यात पदव्यूत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ३० एप्रिल पासून सुरू होत आहे. यामध्ये एम ए, एम एस्सी व एम कॉम साठी ७६ परीक्षा केंद्र आहेत. तर बी एड अभ्यासक्रमासाठी २६ परीक्षा केंद्र आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा ३० एप्रिलपासून सुरु होईल्. तर विधि (सात केंद्र), अभियांत्रिकी (सहा ) तर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे १२ परीक्षा केंद्र आहेत. या तीन अभ्यासक्रमांची परीक्षा १५ मे पासून सुरु होणार आहे. या परीक्षेसाठी चार जिल्ह्यात एकूण ३२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदरील परीक्षा सुरळीत पार व कॉपी मुक्त वातावरणात पार पाडाव्यात तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केद्रावर सहकेंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. उन्हाळी २०२४ परीक्षांचे निकाल विहित मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हयानिहाय १६ मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास ०८ मूल्यांकन केद्र निश्चित करण्यात आले आहेत.