एमजीएम विद्यापीठात सुरू करण्यात आले शहरातील पहिले ‘सेंटर ऑफ इनोव्हेशन इन हॉस्पिटॅलिटी’
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे शहरातील पहिल्या ‘सेंटर ऑफ इनोव्हेशन इन हॉस्पिटॅलिटी’केंद्राचे उद्घाटन सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, संचालक डॉ कपिलेश मंगल, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेफ विष्णु मनोहर म्हणाले, एमजीएम विद्यापीठ कायम विद्यार्थ्यांना दर्जात्मक सुविधा उपलब्ध करून देत आले आहे. आज सुरू करण्यात आलेल्या सेंटर ऑफ इनोव्हेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतेला न्याय देत प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. एखाद्या महाविद्यालयात सुरू होणारे हे शहरातील पहिलेच केंद्र आहे.
एमजीएम विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आले आहे. आज सुरू करण्यात आलेल्या इनोव्हेशन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन डिश तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मिक्सोलॉजीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येथे कॉकटेल, माँकटेल बनविता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पदार्थ बनविण्यासाठी स्वतंत्र किचनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विशेषत: विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह बाहेरच्या विद्यार्थ्यांनाही या केंद्राचा वापर करता येणार असल्याचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
संचालक डॉ कपिलेश मंगल म्हणाले, विद्यार्थ्यांना या माध्यमातून उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चॅनलसाठी जाहिरात बनवणे, युट्यूबसाठी व्हिडिओ तयार करणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ व पेय येथे विद्यार्थी आता अधिक चांगल्याप्रकारे बनवू शकणार आहेत. विद्यार्थी या केंद्राचा अधिकाधिक लाभ घेत येथे प्रयोग करतील असा विश्वास व्यक्त करतो.