भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २६ एप्रिल रोजी २९ वा वर्धापन दिन साजरा होणार
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २९ वा स्थापना दिन समारंभ शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजता भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, सातारा रोड, धनकवडी, पुणे ४३ येथे साजरा होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही गोपाला गौडा उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ विश्वजीत कदम, सहकार्यवाह व भा म्हेत्रे, डॉ एम एस सगरे, डॉ के डी जाधव, कुलसचिव जी जयकुमार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ विवेक सावजी यांनी दिली.
डॉ सावजी म्हणाले, जिद्द आणि महत्वाकांक्षा याच्या बळावर डॉ पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने गेल्या २८ वर्षात गुणवत्तेच्या बळावर उत्तम कामगिरी करून नामांकित विश्वविद्यालय म्हणून नावलौकिक मिळविला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ए ग्रेड युनिव्हर्सिटी म्हणून उमटवलेली मोहर, नॅकने मूल्यांकनात आणि पुनर्मूल्यांकनात दिलेला अ + दर्जा, एनआयआरएफमध्ये महाविद्यालयांनी मिळवलेले मानांकन या गोष्टी विश्वविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवणाऱ्या आहेत.