‘एस्री-इंडिया’च्या स्टोरीमॅप स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे डॉ अभिजीत पाटील विजेते

कोल्हापूर : राष्ट्रीय स्तरावरील स्टोरीमॅप स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील अध्यापक डॉ अभिजीत पाटील यांनी विजेतेपद प्राप्त केले आहे. ‘हिडन जेम्स ऑफ बांदिवडे: द जिऑलॉजिकल ट्रेजर’ या विषयावरील प्रकल्प त्यांनी सादर केला. जीआई एस (भौगोलिक माहिती प्रणाली) या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी संस्था असलेल्या एस्री- इंडिया (Environmental Systems Research Institute)  या संस्थेमार्फत गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर स्टोरी-मॅप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

स्टोरीमॅप स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या डॉ अभिजीत पाटील यांचे ग्रंथ भेट देऊन अभिनंदन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के. सोबत डॉ सचिन पन्हाळकर.

यापूर्वी सन २०२१ व २०२२ या वर्षीच्या स्पर्धेमध्ये अनुक्रमे आयआयटी गुवाहाटी येथील स्पर्धकाच्या ‘ब्रह्मपुत्रेचा पूर’ आणि आयआयटी खरगपूर येथील स्पर्धकाच्या ‘पर्वतांचे भूत’ या स्पर्धकांनी पटकावले आहे. या स्पर्धेसाठी गतवर्षी (२०२३) डॉ पाटील यांनी “हिडन जेम्स ऑफ बांदिवडे: द जिऑलॉजिकल ट्रेजर” या विषयावरील प्रकल्प सादरीकरण केले. या सादरीकरणाने केवळ प्रेक्षकांनाच भुरळ घातली नाही तर बांदिवडेच्या निर्मनुष्य, निसर्गरम्य भूगर्भीय चमत्कारांच्या अंतर्दृष्टीपूर्ण शोधासाठी व्यापक प्रशंसाही मिळवली. आणि स्पर्धेमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट ठरविण्यात येऊन विजेता घोषित करण्यात आले. 

Advertisement

 सदर यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी डॉ अभिजित पाटील यांचे ग्रंथ भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी डॉ सचिन पन्हाळकर उपस्थित होते.

बांदिवडे गावासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प

या स्पर्धेसाठी डॉ पाटील यांनी निवडलेला विषय हा कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठरालगत असणाऱ्या बांदिवडे (ता पन्हाळा) या गावातील अग्नि स्तंभांवर आधारित आहे. भारतातील सर्वात दुर्मिळ बहुभुज स्तंभ, बेसाल्ट संरचना या ठिकाणी पहावयास मिळते. याची निर्मिती 65.6 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असावी. येथील काही स्तंभाची उंची ४० मीटरपेक्षा जास्त आहे. जगामध्ये अशा संरचना खूपच कमी पाहायला मिळतात. असे असूनदेखील या संरचनेची शास्त्रीय व पर्यटन दृष्टीकोनातून महत्त्व व माहिती खूप कमी लोकांना आहे. म्हणूनच डॉ अभिजित पाटील यांनी स्टोरी-मॅप स्पर्धेसाठी या ठिकाणाची निवड केली. यासाठी त्यांनी या संपूर्ण परिसराचे ड्रोनद्वारे त्रिमितीय सर्वेक्षण केले. तसेच या परिसराचे भूगर्भीय, पर्यटन व शैक्षणिक महत्त्व या स्पर्धेसाठीच्या मांडणीतून अधोरेखित केले. सदर स्टोरी-मॅप https://storymaps.arcgis.com/stories/8026938431344319bd5eeb791584e1eb या संकेतस्थळावर पाहावयास मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page