संकट समयी अभाविप येते कामा..
संकट समयी अभाविप येते कामा..
July 4, 2023
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विश्वातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावी पणे आंदोलन करणारी, त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून विद्यार्थ्यांना परिचित आहेच. सोबतच राष्ट्रीय मुद्द्यांवरही आपले मत ठामपणे मांडणारी, कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना सदैव राष्ट्र आणि समाजासाठी कार्यरत राहण्याची शिकवण देणारी, राष्ट्र प्रेमाचा जागर तरुणांमध्ये करणारी एक राष्ट्र व्यापी संघटना आहे. अभाविप च्या या दैनंदिन कामास शैक्षणिक क्षेत्र सुपरिचित आहे आणि याचीच पोहोच पावती म्हणून विद्यार्थी दर वर्षी होणाऱ्या सदस्यता अभियानास भरभरून प्रतिसाद देतात पुणे शहरात दर वर्षी २५,००० पेक्षा अधिक सदस्यता म्हणजे आमच्या साठी विद्यार्थ्यांचा विश्वास आणि प्रेम आहे.
विद्यार्थ्यांचे हेच प्रेम, विश्वास आणि संघटनेची समाजासाठी काम करण्याची शिकवण आम्हांला विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी अधिक कामाची प्रेरणा देते. कोरोनाचे संकट जगभरात आणि भारतात पसरत असताना अभाविप पुणे शाखेचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत मिळावी म्हणून पूर्व तयारी करत होते. त्यात माहिती संकलन करणे, प्रशासनाशी ताळमेळ ठेवून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घरी जाण्यामध्ये मदत करणे आणि पुढील उदभवणाऱ्या परीस्थितीचा अंदाज घेवून विद्यार्थी मदत केंद्राची स्थापना करणे असे कार्य सुरु झाले. सामाजिक कामाची भूक कार्यकर्त्यांना शांत बसू देत नव्हती. तोच केंद्र शासनाने २४ मार्च २०२० रोजी पहिला लॉकडाऊन घोषित केला आणि अभाविप ने विद्यार्थ्यांसाठी तत्काळ मदत मिळावी या करता सेवा उपक्रमांची सुरवात केली.
अभाविप ने सुरु केलेल्या मदत केंद्रावर मदती साठी विद्यार्थ्याचे फोन येऊ लागले. महाराष्ट्राचे बहुतेक विद्यार्थी हे सुरवातीच्या काळातच आपल्या गावी परत जाऊ लागले अडचण झाली ती विविध राज्यातून आणि विशेष करून ईशान्य राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची. या विद्यार्थ्यां साठी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अभाविप ने रेशन किट वितरण, भोजन वितरण आणि गैस टाकी भरून देणे सुरु केले, याचा ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना मोठा उपयोग झाला साधारणपणे २५०० ईशान्येकडील विद्यार्थ्याना घर पोहोच राशन आणि बचाव किट देण्यात आले सोबतच स्थानिक कार्यकर्ते त्यांना जोडून दिल्या मुळे त्यांची सुरक्षितता आणि इतर आवश्यक सर्व मदत मिळवून देण्यात आली. या कामाची दखल घेत मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री श्री.बीरेन सिंघ आणि सामाजिक न्याय मंत्री सौ.नेमचा किप्गेन यांनी ट्विटर द्वारे अभाविप पुण्याचे आभार मानले. अभाविप मध्ये नियमित गायले गेलेले गीताच्या ओळी “कोई ना भूका कोई ना पिछड़ा यही अटल कर्तव्य हमारा” हेच या सेवा प्रकल्पाचे ब्रीद वाक्य बनले.
पुढील काळात अशीच अडचण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची झाली या विद्यार्थ्याना मदत करण्याकरिता World Organisation of Students and Youth या जागतिक संघटनेची मदत घेण्यात आली. या मुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कृती प्रमाणे जेवण पुरवण्यात आले, विशेष करून रमजान च्या काळात मुस्लीम देशातील विद्यार्थ्यांना उपवास लक्ष्यात घेवून मदत करण्यात आली.या प्रयत्नांमुळे नक्कीच या विद्यार्थ्यांच्या मनात आणि त्यांच्या देशात भारता बद्दल प्रेम आणि आदर भाव निर्माण झाले असेल.
लॉकडाऊन च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थी विशेष परवानगी घेवून मोठ्या प्रमाणात घरी जाण्यासाठी निघाले अशा विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवासी मजुरांसाठी अभाविप कार्यकर्ते प्रवास कीट, बचाव कीट आणि तीन दिवस प्रवासात पुरेल आणि टिकेल असे भोजन, रेल्वे स्थानकावर वितरीत करत होते. या करिता संबंधित राज्यातील अभाविप शाखा आणि राज्य सरकार बरोबर ताळमेळ बसवून श्रमिक ट्रेन ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून घेतली जात होती या मुळे हजारो श्रमिक बांधव आणि विद्यार्थ्यांना मदत करता आली काही वेळेस तर ट्रेन भल्या पहाटे असायच्या पण कार्यकर्ते रात्रभर जागून, कीट तयार करून वेळे पूर्वी हजर राहून विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही याची खात्री करायचे. या व्यतिरिक्त जवळचा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहन व्यवस्था आणि शासकीय मदत मिळावी या करिता प्रयत्न केले गेले आणि अजून हि विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचावा या करिता निरंतर कार्यकर्ते काम करीत आहेत.
एकीकडे सेवेचा निरंतर ओघ सुरु होता आणि आहे दुसरी कडे कोरोनाचे संकट पुण्यामध्ये अधिक गडद होत गेले, या परिस्थितीत सुद्धा कार्यकर्ते परिणामांची काळजी न करिता सतत कार्यरत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुणे महानगरपालिका यांच्या सोबत मिळून अभाविप कार्यकर्त्यांनी पुण्यातील विविध भागात जलद तपासणी केली सोबतच आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषध आणि मास्क चे वाटप केले. कोरोनाची लागण होण्याची शक्यता असताना कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरा पासून महिनाभर लांब राहून हे हि कार्य पूर्ण केले या जलद तपासणीचा पुण्यातील लाखो नागरिकांना उपयोग झाला. विशेष करून जिज्ञासा म्हणजेच आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीनी या उपक्रमात पुढाकार घेतला या तरुणींनी भवानी पेठ आणि ताडीवाला रोड सारख्या सर्वात जास्त संक्रमित भागात जलद तपासणी केली. अभाविप मध्ये विद्यार्थिनी फक्त मंच सांभाळत नाहीत तर संकट काळात आपले कर्तव्य ओळखून सामाजिक आघाडी पण सांभाळतात हेच यातून सिद्ध झाले.
हे काम करताना कार्यकर्त्यांना पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि डॉक्टर करत असलेल्या कष्टाची जान झाली त्यांचासाठी काळजी आणि आदर निर्माण झाले. यातूनच पुढे या कर्मचाऱ्यासाठीची कृतज्ञता किटची कल्पना पुढे आली या कीट मध्ये सेनिटायजर, मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे होमिओपॅथी औषध आणि आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे चॉकलेट चे बॉक्स असलेले विशेष कीट तयार करण्यात आले. पुण्यातील पोलीस कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांना वाटप करण्यात आले. त्याच बरोबर विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थचे १००० सफाई कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधाचे वाटप करण्यात आले. व या कर्मचाऱ्याचे आभार मानले.
समाजात जिथे कमी तिथे आम्ही अशी भावना घेवून कार्यकर्ते सतत कार्यरत आहेत. कोरोनामुळे रक्तदात्यांची कमतरता भासू लागल्याने अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री सु.श्री निधी त्रिपाठी यांनी कार्यकर्त्यांना रक्तदान करिता आवाहन केले. याला प्रतीसाध देत पुण्यातही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्त दान केले . रक्तदान सतत सुरु आहे आणि पुढेही अडचण निर्माण होऊ नये या करिता रक्त मित्र आणि रक्तगट सूची तयार करण्यात आली आहे. त्याच बरोबर देशाचे मा.प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहना अनुसार विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी ५१,०००/- रुपये PM CARE FUND मध्ये जमा केले आहेत. या करिता अभाविप ने कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या खर्चातील एक भाग देण्याचे आवाहन केले त्याला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतीसाद दिला आहे.
अभाविप ची आषाढ वारी दरम्यान वारकऱ्याना वैद्यकीय सेवा सुविधा देण्याची मोठी परंपरा राहिली आहे, यंदा वारी नाही, रस्त्यांवर वारकरी नाही पण कार्यकर्त्यांनी या हि वर्षी हि परंपरा अखंड ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी “डॉक्टर वारकऱ्यांच्या दारी” हि मोहीम सुरु करण्यात आली आहे या माध्यमातून कार्यकर्ते पुण्यातील कोरोना प्रभावित भागात वैद्यकीय शिबीर, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध आणि मास्क वाटप करत आहेत आता पर्यंत ५००० पेक्षा अधिक कुटुंबाना या शिबिरांचा लाभ मिळाला आहे. या शिबिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाते त्यातून संदिग्ध वाटणाऱ्या व्यक्तींची यादी तत्काळ स्थानिक लोक प्रतिनिधी आणि आरोग्य अधिकारी यांच्या कडे देवून पुढील संसर्ग टाळण्यासाठी विलीगीकरण आणि तपासणी केली जात आहे या मुळे पुण्यातील अनेक परिसर कोरोना मुक्ती कडे वाटचाल करीत आहे. अभाविप चे ३ डॉक्टर आणि ७ कार्यकर्ते प्रत्येक शिबिरात PP कीट घालून सहभागी होतात आणि त्यानंतर काही दिवीस घरातच विलीगीकारणात राहतात. हे कार्य बघून समाजातून हि या कार्याकरिता प्रशंसा, प्रोत्साहन आणि मदत मिळत आहे. त्या आधारावरच हे कार्य पुढेही नियमित सुरु राहणार आहे.
सामाजिक काम करताना शैक्षणिक विषय आणि विद्यार्थ्याच्या समस्यांवरही नियमित पाठपुरवठा सुरु आहे, यात प्रामुख्याने या संकट काळात विद्यार्थ्यान कडून कुठलेही शुल्क घेतले जावू नये याकरिता अभाविप वारंवार संघर्ष करीत आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृह मोफत उपलब्ध व्हावे त्यांना रूम मधून बाहेर काढू नये.या करिता अभाविप सजगतेने कार्य करीत आहेत. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास करता यावे या करिता ONLINE लेक्चर घ्यावे अशी मागणी सुद्धा विद्यापीठाकडे अभाविप ने केली आणि त्यातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने E-RESOURCE मोफत उपलब्ध करून दिले आहेत . अभाविप पुणे च्या फेसबुक पेज वरून हि विद्यार्थ्यांसाठी नियमित लाईव सेशन आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे याचा हि हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.
कोरोना मुळे पुण्यातील शैक्षणिक परंपरचे खूप मोठे नुकसान होणार आहे. मध्यमवर्गातील विद्यार्थी हा पुण्यामध्ये शिक्षणासाठी दर वर्षी च्या तुलनेत कमी येईल त्यामुळे हॉस्टेल, शिक्षण संस्था, मेस, दुकानदार, खोली भाड्याने देणार मालक यांच्या सर्वांच्या अर्थचक्रा वर विपरीत परिणाम पुढील काही महिन्यात दिसू शकतो. तरीही पर गावातील जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यावर अधिक आर्थिक भार पडू शकतो. भितीदायक वातावरण असल्यामुळे प्रवेश कमी होणार त्यामुळे खाजगी शिक्षण संस्था कदाचित जबरदस्त आर्थिक अडचणीत सापडतील कदाचित बंद ही पडतील ज्यामुळे पुढील काही वर्षात पुण्याची ऐकून प्रवेश क्षमता कमी होईल अशी भीती शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
त्याच बरोबर सर सगट विद्यार्थ्यांना पुढील वर्षात पाठवल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर ही नकारात्मक परिणाम दिसणार आहे. त्यात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना तरी किमान कुठल्या न कुठल्या माध्यमातून मूल्यांकन करायला हवे होते ते ही करण्याची शासनाची तयारी नाही त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अन्य राज्यात आणि देशात पुढील उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी त्रास होणार आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नकारात्मकता पसरेल सोबत शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनाचा टक्का प्रभावित होईल.
कोरोना संकट संपल्या नंतर प्रवेश, निवास आणि भोजन व्यवस्था हा तर प्रश्न राहील पण शैक्षणिक परिवारातील सकारात्मक वातावरण निर्माण करणे, टिकवणे आणि वाढवणे या साठीही उपक्रम करावे लागतील. या वातावरणाचा उपयोग प्रवेशाचा टक्का वाढवण्यासाठी होईल. विद्यार्थी आणि पालक यांच्या शैक्षणिक आणि कोरोनाच्या मानसिक भेतीचे समाधान करण्यासाठी तत्पर राहावे लागेल. ऑनलाईन लेक्चर आणि सेमिनार ची सवय आणि जे महत्व आले आहे त्यातून पुन्हा पारंपरिक वर्ग, शिक्षण आणि विद्यापीठ परीक्षेचे महत्व सुद्धा प्रयत्न पूर्वक प्राप्त करून देण्यासाठी काम करावे लागेल. आरोग्य विषयक सत्र, योग आणि आहार विषयी जागरूकता विद्यार्थ्यामध्ये आणावी लागेल या करिता आता अभाविप कार्यकर्ते तयारी करीत आहेत
कोरोना च्या संकट काळात अभाविप च्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हे सिद्ध केले आहे कि विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे. संकट कितीही मोठे असो पण त्याला सामर्थ्याने तोंड देण्याची क्षमता फक्त विद्यार्थी आणि तरुणामध्ये आहे तात्कालिक सेवा किवा विचार न ठेवता समाजात आणि शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा नव्याने शाश्वत विकास करण्याचा विचार या समाज सेवेने झपाटलेल्या अभाविप ने केला आहे.
शुभम अग्रवाल
संघटन मंत्री
अभाविप पुणे