कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांची अमरावती विद्यापीठातील एम बी ए विभागाला भेट
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणा-या प्रज्वल तायडे याचे केले अभिनंदन
विभागातील शिक्षकांशी विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी विद्यापीठातील एम बी ए विभागाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विभागातील शिक्षकांसोबत विविध विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन केले. विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची क्षमता, शिक्षणाची पध्दत, कामगिरी तसेच कौशल्य,विभागाच्या विकासासाठी संशोधन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल, अध्यापनशास्त्र, कौशल्याधारित प्रेरक कार्यक्रम, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आदी विषयांवर यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांशी चर्चा करुन आवश्यक त्या सूचना केल्यात.
याप्रसंगी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांचे विभागप्रमुख डॉ दिपक चाचरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विभागाच्या क्रीडांगणाला कुलगुरूंनी भेट देऊन प्राध्यापक सदस्यांशी संवाद साधला. कार्यालय, सभागृह, वर्गखोल्यांची कुलगुरूंनी तपासणी केली. विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट तसेच रोजगारक्षमतेबाबत चर्चा केली.
आयआयटी खरगपूरव्दारा स्टॉकग्रोच्या सहकार्याने आयोजित मान्यताप्राप्त “बॅटल रॉयल’ या राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणा-या प्रज्वल तायडे याचे कुलगुरूंनी पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर “ईएसजी प्रकटीकरणाद्वारे बदलणारे आर्थिक परिदृश्य- हॅकाथॉन” च्या अंतिम फेरीत यशस्वीपणे भाग घेणा-या विभागातील विद्यार्थी रूचिता ठाकरे, कार्तिक ठाकरे, ज्ञानेश्वर केदार, नरेश जुनघरे यांचेही त्यांनी कौतुक केले.