अमरावती विद्यापीठातील इतिहास विभागात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
डॉ बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला – डॉ किशोर राऊत
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील इतिहास विभागात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे समन्वयक डॉ किशोर राऊत, प्रमुख अतिथी म्हणून डॉ नरेंद्र वानखडे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ नरेंद्र वानखडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणातून डॉ किशोर राऊत म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. मानवी जीवनाच्या सर्वच पैलुवर सखोल व सुक्ष्मपणे काम करून मानवी जीवनाला विकास व प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम डॉ बाबासाहेबांनी केले. प्राध्यापक, प्राचार्य, पत्रकार, संपादक, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, कायदेपंडित, धर्मशास्त्रज्ञ, नीतीतज्ञ, तत्वज्ञ, जलतज्ञ, कृषीतज्ञ, भारतीय संविधानाचे निर्माते, भारताचे पहिले कायदा मंत्री अशा विविध क्षेत्रात कार्य करतांना आपल्या देशाला बाबासाहेबांनी नेहमीच प्राथमिकता दिली असे सांगून डॉ बाबासाहेबांसारखा देशभक्त दुसरा नाही. संविधानातही त्यांनी सर्व जाती, जमाती, वर्ण, वर्ग, वंश, भाषा, प्रदेश डोळ्यासमोर ठेवून सर्वाना समता, स्वातंत्र,बंधुता, समान संधी, सामाजिक न्याय दिला आणि समताधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण केली असेही डॉ राऊत म्हणाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सूत्रसंचालन वृत्तभ घोडाम यांनी, तर आभार किरण नाईक हिने मानले. कार्यक्रमाला प्रा शाश्वत साखरकर, प्रा मुटकुरे, प्रा कैलास चव्हाण, जयश्री आठवले, आदित्य इंगळे, श्रेया विरुळकर, प्रतिक निकाळजे, अमृता मुंद्रे, आकाश वानखडे, संस्कृती इखार, लखण चव्हाण, कार्तिक तांबे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.