छत्रपती शिवाजी : सामाजिक क्रांतीचे जनक

छत्रपती शिवाजी : सामाजिक क्रांतीचे जनक

“कुंद कहा, पयवृंद कहा,

अरुचंद कहा, सरजा जस आगे

बाज कहा, मृगराज कहा

अतिसाहस मे शिवराज के आगे”.!

chhatrapati shivaji maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अभ्युदयाचा कालखंड होय. इस्लामी आक्रमणे व तत्कालीन सत्ताधीशांच्या अज्ञान, अंधश्रद्धा, किंकर्तव्यमूढ व गतीहीन बनलेल्या समाजाला राष्ट्रवादी विचारांनी व प्रेरणेने जागृत करण्याचे, संघटित करण्याचें व कार्यक्षम बनवण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांनी महाराष्ट्रातील समाजात चैतन्याची धर्म व समाज रक्षणाच्या कार्यक्षमतेची प्रेरणा जागृत केली.

संघटित बनलेल्या व स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रभावित झालेल्या समाजाच्या मदतीने महाराष्ट्रात एका स्वतंत्र सत्तेची स्थापना करण्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले. या स्वातंत्र्याच्या व स्वराज्याच्या स्थापनेमुळे महाराष्ट्रातील समाजात आत्मविश्वास निर्माण झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच या समाजाने पुढे सुमारे दोनशे वर्षे इस्लामी सत्तेबरोबर प्रखर संघर्ष केला. स्वराज्य रक्षणाचे जीवापाड प्रयत्न केले.

महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र सत्तेचा उदय ही एकाएकी घडलेली घटना नव्हती प्रस्थापित समाज आणि अप्त स्वकीयांशी महाराजांना प्रथम प्रखर संघर्ष करावा लागला. महाराजांची अर्ध्यापेक्षा जास्त हयात स्वकियांशी व महाराष्ट्रातील प्रस्थापितांशी संघर्ष करण्यात गेली.

हे प्रस्थापित महाराजांचे अस्तित्व मान्य करायला तयार नव्हते. अतिशय बुद्धिमानी असणाऱ्या महाराजांना हे कळायला वेळ लागला नाही. त्यांच्या लक्षात आले प्रस्थापित समाज आपल्याला नाकारतोय. राजेरजवाडे, सरदार आपणास विरोध करत आहेत आणि येथेच सामाजिक क्रांतीची बीजे महाराजांच्या मनात रुजली गेली.

जात- पात धर्माच्या पलीकडे जाऊन महाराजांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.तो निर्णय होता उदारमतवादाचा, तो निर्णय होता धर्मनिरपेक्षतेचा. तो निर्णय होता पुरोगामित्वाचा म्हणजेच जगात पहिल्यांदाच हे पाहायला मिळत होते. माणूस जातीने, धर्माने मोठा होत नाही तर तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो. महाराजांचे त्यावेळी वय अवघे बारा वर्षांचे होते. ज्या वयात खेळायचे, बागडायचे त्याच वयात आणि तेही महाराष्ट्रातच राजकीय क्रांती बरोबरच सामाजिक क्रांतीची बीजे रोवली गेली.

जगाच्या इतिहासात प्रथमच असे घडले. असे म्हणतात पंधराव्या शतकात युरोपात प्रबोधनाचे वारे वाहू लागले आम्ही त्याही एक पाऊल पुढे होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मराठा, शेतकरी, कष्टकरी, महार, मांग, रामोशी, फासेपारधी, मुस्लीम इत्यादी समाजातील वयाने लहान लहान परंतु चाणाक्ष सवंगड्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात एक प्रकारची क्रांती घडवून आणली. ही एकाएकी घडलेली घटना नव्हती येथील समाजात ही वैशिष्ट्ये होती.या वैशिष्ट्यांना स्पुर्लिंग देण्याचे, प्रज्वलित करण्याचे व समाजाला कार्यक्षम बनविण्याचे असामान्य कार्य महाराजांनी केले.

प्रसिद्ध इटालियन प्रवासी” ॲबे बार्थेलो कँरे” अफजलखानाच्या स्वारीचे युरोपमध्ये वर्तमानपत्रातील वर्णन एकूण तो शिवाजीला पाहण्यासाठी 1668 भारतात आला. तो मायदेशाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो” शिवाजी च्या रूपाने भारतात प्रथमच वेगळे घडत होते, तेथील समाजात आपल्या राज्याविषयी आपुलकी दिसून येते, एव्हाना इतर ठिकाणी राजाला जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते. भारतात मात्र राजासाठी सर्वस्व अर्पण करायला जनता तयार होती आणि तो काळ आहे शिवाजीचा”. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य बांधतांना सामाजिक समतेचा पुरस्कार केलेला दिसून येतो.

Advertisement

त्यांनी आपल्या प्रशासनात जगात सर्वात प्रथम वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. बहिबहिर्जी नाईक सारख्या अतिशय बुद्धिमान परंतु रामोशी समाजातील व्यक्तीला हेरखात्याचा प्रमुख पदी नियुक्त करून जगाला दाखवून दिले की, बुद्धिमत्ता ही कुणाची बटीकं नाही ती निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. माणसाचे कर्तुत्व तो कोणत्या जातीत जन्माला यावं ठरत नसून त्याच्या अंगी असणाऱ्या सद्गुणावरून व त्याच्या बुद्धिचातुर्या वरून ठरत असते. या न्यायाने शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेतले.

ब्रिटिश सरकारचा वकील “हेन्री ऑक्झिंडेन” महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी रायगडावर उपस्थित होता. त्यांनी मायदेशी पाठवलेल्या अहवालामध्ये तो म्हणतो “शिवाजी महाराजांकडे बघितल्यावर कोणाला सांगायला गरज पडत नाही कि हा एखाद्या प्रदेशाचा राजा आहे. एवढे तेज त्याच्या चेहर्‍यावर झळकत असते. त्याला पाहिल्यावर क्षणभर भुरळ पडावी, त्याचे स्मितहास्य इतके मोहक, त्याची वाणी इतकी मृदू परंतु तितकीच आश्वासक आणि कठोर, त्याच्या प्रशासनात सर्व जाती धर्मांना समान न्याय होता आणि त्यासाठी तो तितकाच दक्ष असे. त्याच्याकडे गुणवत्तेला महत्त्व होते.”

भीमसेन सक्सेना हा मिर्झाराजांच्या स्वारीबरोबर दक्षिणेत आला होता. तो आपल्या “तारीखे दिलकुशा” या ग्रंथात लिहितो की मी स्वतः शिवाजी महाराजांना पाहिले आहे. त्यावेळी मी मोगलाच्या चाकरीत होतो. शिवाजीची पद्धत मोगला पेक्षा कितीतरी वेगळी होती. तो जातीने सैनिकांची विचारपूस करत असे. त्याच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोकं होते. सैनिकांच्या कुटुंबाची तो जातीने काळजी घेत असे. त्याची नजर भेदक होती आणि कोणत्याही प्रसंगी त्याच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास ओसंडून वाहत असे. “शत्रु पक्षातील व्यक्तीसुद्धा महाराजांची स्तुती करत होते यावरून महाराजांच्या कर्तृत्वाची प्रचिती येते.

रियासतकार गो. स. सरदेसाई आपल्या “शककर्ता शिवाजी” या पुस्तकात म्हणतात “शिवाजीच्या स्वराज्यात प्रथम राज्य व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव राष्ट्रास मिळू लागला. अगदी अप्रसिद्ध असणारे लोक भराभर पराक्रम गाजवू लागले. भिक्षुकांचे मुत्सद्दी झालें, शेतकऱ्यांची सेनापती व जागीरदार झालें, कारकुनांचे अंमलदार बनले, त्यास आणखीन थोडी विद्देची जोड असती तर राष्ट्राचा भावी इतिहास आणखी वेगळाच झाला असता”.

कॉ. श्रीपाद अमृत डांगे आपल्या “बारा भाषणे” या साहित्यात लिहितात की “जनतेचा ध्यासातील आदर्श राजा शिवाजीच्या रूपाने अवतरला. शिवाजीने तडकाफडकी जुनी वतनी खालसा केली. जुन्या करपद्धती रद्द केल्या, भूदासावरील अमर्याद हुकूमत नष्ट केली, आणि जमीन महसुलाचे मक्ते द्यायची पद्धत बंद केली. प्रत्येकाला कसायला जमीन, कुळाला स्थिरता, प्रत्यक्ष पैदा केलेल्या पिकावरच कर आकारणी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर वतनदारांचा हक्क नाही या शिवाजीच्या आर्थिक सुधारणा होत”.

एकुणच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाच्या इतिहासात सामाजिक समतेचा नवा संदेश देण्याचे कार्य केले. ज्या समाजात आपल्याच बांधवांना अस्पृश्य ठरवून हीन वागणूक दिली जात होती, ज्या समाजात स्त्रीला पतीच्या निधनानंतर त्याच्या चितेवर जिवंत जाळण्याचा प्रकार धर्मकृत्य समजला जात असे, जिथे समुद्रपर्यटन गुन्हा समजला जात होता तिथे कोलंबस व वास्को-द-गामा का निर्माण झाले नाही याबद्दल आश्चर्य तरी का वाटावे.

स्पृश्य-अस्पृश्य, रूढी-परंपरांच्या श्रंखला तोडणे अशक्यप्राय असताना मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणे ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनात रुजवली. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना जागतिक सामाजिक क्रांतीचे जनक म्हणावे लागेल. हीच त्यांच्या जयंती दिनी त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Prof Dr Mukundraj Telap Patil

प्रा. डॉ. मुकुंदराज तेलप पाटील, बीड

9403391001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page