एमजीएममध्ये ‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेड, एमजीएम स्कूल व एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय आणि उच्च शिक्षणावर आधारित ‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, परिषदेच्या सुकाणू समितीचे डॉ विलास सपकाळ, डॉ विजयम रवी, डॉ आशिष गाडेकर, परिषदेच्या समन्वयक डॉ अपर्णा कक्कड, कॉन्फरन्स चेअर रणजीत कक्कड, प्रोग्रॅम चेअर डॉ नम्रता जाजू व सर्व संबंधित उपस्थित होते.
आज झालेल्या पहिल्या सत्रामध्ये ‘डायनॅमिक पेडियागॉगी – अ स्टेप टुवर्ड्स पर्सनलाईझ्ड लर्निंग’ या विषयावर डॉ अंजुली अहुजा तर ‘असेसमेंट अँड इव्हॅल्यूएशन – बियाँड मार्क्स अँड ग्रेड्स – अ लेन्स टू आयडेंटिफाय अँड क्लोज लर्निंग गॅप्स’ या विषयावर आयआयटी मद्रासचे प्रा डॉ अरुण तंगीराला यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
दुपारच्या सत्रामध्ये संगमनेर येथील अमृतवाहिनी मॉडेल स्कुल अँड ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी हार्नेसिंग दि पॉवर ऑफ स्टुडंट व्हायसेस : ‘दि वर्ल्ड इज माय स्कुल’ या विषयावर आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे ‘पर्सूईंग पेडागॉजिकल एक्सलन्स : दि व्हाय, व्हॉट अँड हाऊ’ या विषयावर बोलताना स्किल शेयर इंडियाच्या संस्थापक मोनिका कपूर म्हणाल्या, समकालीन काळामध्ये असणारी परीक्षा पद्धती ही वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सारखीच आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्याप्रमाणे परीक्षा पद्धती असायला हवी. तसेच विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर आहे.
प्रत्येक सत्र संपन्न झाल्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली. या तीन दिवसांच्या परिषदेचा समारोप चर्चासत्राने करण्यात आला.