गांधी विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी शिक्षकांवर – डॉन डूंगाजी
‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ राष्ट्रीय परिषदेचा दूसरा दिवस संपन्न
छत्रपती संभाजीनगर : शिक्षणामध्ये शांतता शिकवत तिचे महत्व सांगितले जाते का? आजचा शिक्षक सर्वसमावेशकता शिकवतो का? शिक्षक स्वीकारणे आणि सहनशिलता शिकवतो का? हे सर्व प्रश्न उपस्थित करीत असताना शिक्षणतज्ञ आणि शिक्षकांवर महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, दलाई लामा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या विचारांची पिढी निर्माण करण्याची खूप मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन टाटा समूहाचे डॉन डूंगाजी यांनी यावेळी केले.
एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेड, एमजीएम स्कूल व एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय आणि उच्च शिक्षणावर आधारित ‘लीड दि एज्युकेशन फ्यूचर’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रामध्ये विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात टाटा समूहाचे डॉन डूंगाजी यांनी ‘दि ईसेन्स ऑफ एज्युकेशन : चॅलेंजेस ऑफ दि ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरी’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. दुसऱ्या सत्रामध्ये ‘मेकिंग दि मोस्ट ऑफ दि ऑपॉर्च्युनिटीज अव्हेलेबल इन दि २०२४ -२५ इंडियन एज्युकेशन लँडस्केप’ या विषयावर स्कूल एज्युकेशन, इग्नूचे संचालक डॉ चंद्रभूषण शर्मा यांनी आपले विचार मांडले.
यावेळी, परिषदेच्या सुकाणू समितीचे डॉ विलास सपकाळ, डॉ विजयम रवी, डॉ आशिष गाडेकर, परिषदेच्या समन्वयक डॉ अपर्णा कक्कड, प्रोग्रॅम चेअर डॉ नम्रता जाजू व सर्व संबंधित उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉन डूंगाजी म्हणाले, व्यवसायास काहीतरी मोठा हेतु असतो, नैतिकता सर्वोपरि असते आणि थांबायला शिकणे हे महत्वाचे असून मी हे माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत आलो आहे. आज पालक पाल्यांकडे गुंतवणूक म्हणून पाहत असून पालकांनी पाल्यांना शिकवणे आवश्यक आहे, मात्र पालकांकडे आज वेळ आहे का? हा प्रश्न आहे. शिक्षकांनी पालकांची भूमिका निभावणे ही समकालीन काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे धर्मामध्ये मानवतावातावादाबद्दल बोलले जाते मात्र, वास्तवामध्ये मानवता हाच एकमेव धर्म असून जो आपण सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. आपण शिक्षणाच्या माध्यमातून मानवतावाद म्हणजे धर्म मानणारी समाजव्यवस्था निर्माण करू शकतो.
पुस्तकी ज्ञानाबरोबर जीवन जगत असताना येणाऱ्या अनुभवातून आणि आपल्या परिवाराकडून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवते. वय वर्ष ३ ते वय वर्ष ६ या वयोगटातील मुलांचे शिक्षण अत्यंत महत्वपूर्ण असते. हा त्यांच्या जडणघडणीतील महत्वपूर्ण भाग असून हा विकासाचा पहिला टप्पा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात शिक्षण देणे गरजेचे असून यातूनच पुढे राष्ट्राचा विकास घडेल. शेवटी, आपण ‘भारतीय’ आहोत हीच आपली ओळख असून इतर बाबींना अधिक महत्व देण्याची आवश्यकता नसल्याचे स्कूल एज्युकेशन, इग्नूचे संचालक डॉ चंद्रभूषण शर्मा यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोग्रॅम चेअर डॉ नम्रता जाजू यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी कांगरिया, पलक वर्मा व निहारिका कपूर यांनी केले. प्रत्येक सत्र संपन्न झाल्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.