एमगिरी संस्थेचे संचालक व शिष्टमंडळाने दिली एमजीएम विद्यापीठास भेट
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था, वर्धा (एमगिरी) येथील शिष्टमंडळाने महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या विविध विभागांना भेटी देऊन सविस्तरपणे माहिती घेतली. एमगिरी ही संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत चालणारी एक राष्ट्रीय स्वायत्त संस्था आहे. शिष्टमंडळामध्ये संस्थेचे संचालक डॉ आशुतोष मुरकुटे, डॉ जयकिशोर छंगानी व प्रा स्वानंद कळंबे यांचा समावेश होता. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनी शिष्टमंडळातील सर्वांचे विद्यापीठात स्वागत केले. यावेळी सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व सर्व संबंधित उपस्थित होते.
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था खादी व टेक्स्टाईल, बायोप्रोसेसिंग व हर्बल, रूरल केमिकल इंडस्ट्री, रूरल क्राफ्ट व इंजिनियरिंग, रूरल एनर्जी व इन्फ्रास्ट्रक्चर, मॅनेजमेंट व सिस्टीम या ६ विषयांवर काम करीत असून विविध प्रकारचे यशस्वी प्रयोग संस्थेने आजपर्यंत केलेले आहेत. संस्थेंतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण, अभ्यासक्रम, कम्युनिटी रेडिओ, संशोधन, ग्रामीण भागात उद्यमिता विकासासाठी ना नफा – ना तोटा तत्वावर प्रशिक्षण कार्यक्रम अशा अनेक पातळ्यांवर काम सुरु असल्याचे संचालक डॉ आशुतोष मुरकुटे यांनी सांगितले.
एमजीएम विद्यापीठाचे विद्यार्थी येत्या काळामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी एमगिरी संस्थेला भेट देतील. विद्यार्थ्यांना तेथे अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतील. एमजीएम विद्यापीठ आणि एमगिरी या दोन्ही संस्था मिळून येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सामोरे ठेऊन काम करतील, असा विश्वास कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी व्यक्त केला.