इटलीच्या अहिंसावादी अल्सांड्रो पावलो यांनी साधला एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र व मानव्य विद्या आणि आंतरविद्या शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘द पॅराडिग्म ऑफ नॉन व्हायलन्स’ या विषयावर इटली येथील अल्सांड्रो पावलो यांनी मंगळवार, दि २ मार्च २०२४ रोजी विद्यापीठाच्या विनोबा भावे सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, प्रा बाळासाहेब सराटे, प्रा रामेश्वर कणसे, प्रा भागवत वाघ, प्रा झरीना देशमुख, प्रा मंजुश्री लांडगे, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना अल्सांड्रो पावलो म्हणाले, जगात वसाहतवादाने मानवी संकल्पनेत मोठा बदल केला आहे. राष्ट्र-राज्य या संस्था मजबूत करुण त्यातून सत्ता केंद्रीत करण्यासाठी हिंसेच्या माध्यमातून नवीन व्यवस्था निर्माण होत आहे, जी दुसऱ्या मानव जमातीचे शोषण करते. यामुळे ‘इकॉनॉमी आणि इकोलॉजी’ आंतरधर्मीय अध्यात्म आणि महात्मा गांधीजींनी सांगितलेली स्वदेशी, स्वराज आणि सर्वोदय तत्व यातुन शाश्वत विकास साधता येईल व जीवन जगत असताना जगासाठी अहिंसेचा मार्गच मार्गदर्शक ठरेल.
राज्य हेच मुळात शोषणाचे मूळ आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून नियमांचे पालन केल्यास राज्याची आवशकता राहणार नाही आणि शोषण थांबेल. पण नियम हे तर असणारच. राज्यविरहित समाज म्हणजे अराजकता अर्थात अंदाधुंदी नाही तर ती एक व्यक्तीच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आधारित आदर्श व्यवस्था असल्याचे अल्सांड्रो पावलो यांनी यावेळी सांगितले.
सध्या अल्सांड्रो पावलो हे एमजीएम विद्यापीठात तीन दिवसाच्या भेटीवर आले आहेत. त्यांनी बारा वर्षे अहिंसा स्वयंसेवक म्हणून काम केले असून सध्या ते भारतभर प्रवास करत भारतातील महात्मा गांधी यांच्या विचारांच्या विविध आश्रम व संस्थाना भेटी देत आहेत.