डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षांना सुरुवात
- पदवीला एकूण २ लाख ४७ हजार विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या (रिपीटर) परीक्षा मंगळवारपासून (दि २) सुरळीतपणे सुरु झाल्या आहेत. तर पदवी अभ्यासक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १५ एप्रिलपासून सुरु होत असून एकूण दोन लाख ४७ हजार ७०९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा (रिपीटर ) २ एप्रिलपासून सुरु झाल्या आहेत. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
सदरील परीक्षा सुरळीत पार व कॉपी मुक्त वातावरणात पार पाडाव्यात तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केद्रावर सहकेंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. उन्हाळी २०२४ परीक्षांचे निकाल विहित मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हयानिहाय १६ मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ०८ मूल्यांकन केद्र निश्चित करण्यात आले आहेत. पदवी अभ्यासक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांची (रेग्युलर) परीक्षा १५ एप्रिलपासून सुरु होत असूनपदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा एप्रिल अखेरीस सुरु होणार आहे.
पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची (रिपीटर व रेगुलर असे सर्व ) एकूण संख्या दोन लाख ४७ हजार ७०९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ९५ हजार ९४८ विद्यार्थी हे विज्ञान अभ्यासक्रमाचे आहेत. तर कला शाखेचे ६९ हजार ८४८ व वाणिज्य अभ्यासक्रमाचे ४६ हजार ८०३ विद्यार्थी आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ भारती गवळी यांनी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी व प्राध्यापकांचे प्रशिक्षण असल्यामुळे येत्या शनिवारी (दि ६) होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. संबंधित अभ्यासक्रमाच्या अखेरच्या पेपरच्या दुसऱ्या दिवशी सदर पेपर घेण्यात येईल, असेही परीक्षा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.