अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न
आपल्या संस्थेप्रती प्रेम व कार्यभावना हीच खरी कर्तव्यपूर्ती होय – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचा-यांना सन्मानपूर्वक निरोप
अमरावती : सेवानिवृत्त होत असतांना कर्मचारी आपल्या संस्थेप्रती जे प्रेम व कार्यभावना, आस्था बाळगतात, संस्थेप्रती समाधान व्यक्त करतात, हीच खरी कर्तव्यपूर्ती होय, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अधिसभा तथा व्य प सदस्य डॉ प्रवीण रघुवंशी, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, सहा. कुलसचिव अनिल मेश्राम, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, नियंत्रण अधिकारी गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ वैशाली धनविजय, विद्या विभागाचे उपकुलसचिव आर व्ही दशमुखे, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर, सत्कारमूर्ती रामेश्वर राऊत, राऊत, अनुराधा खडसे यांची उपस्थिती होती.
कुलगुरू पुढे म्हणाले, महिला कर्मचा-यांना नोकरी करतांना आपले घर सुध्दा सांभाळावे लागते, त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. कामाच्या व्यापामुळे आपल्या अनेक इच्छा, आकांक्षांना वेळ देता येत नाही. परंतु वेळात वेळ काढून आपण आपल्या आशा, आकांक्षांचीही पूर्तता करावी. नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवणे व वाढविणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. असे असले तरी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी या आव्हानांना नक्कीच सामोरे जात आहेत. सेवानिवृत्त झाले असले, तरी सुध्दा या संस्थेचा आपण अविभाज्य भाग आहात, असे म्हणून कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांना पुढील आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्यात.
कर्तव्यपूर्तीतून कर्तव्याचं रुप दिसते – डॉ प्रवीण रघुवंशी
प्रमुख अतिथी डॉ प्रवीण रघुवंशी म्हणाले, सेवानिवृत्त होत असतांना सेवाकाळात केलेल्या कार्याचे मोठे समाधान असते आणि कर्तव्यपूर्तीतून आपल्या कर्तव्याचं खरं रुप दिसत असते. सहका-यांशी जुळलेलं नातं हे कायम टिकून राहते, असे सांगून रखडलेल्या प्लेसमेंटचा प्रश्न शक्य तितक्या लवकर निकाली काढला जाईल, असे कर्मचा-यांना त्यांनी आश्वस्त केले व सत्कारमूर्तींना पुढील उज्ज्वल भविष्याच्या शुभकामना दिल्या.
यावेळी श्री रामेश्वर राऊत व खडसे यांचा कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी शॉल, श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. तर राऊत यांचा रजनी चपाटे, अनुराधा खडसे यांचा उमा चांभारे यांनी साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने उपाध्यक्ष डॉ अविनाश असनारे व सचिव श्रीकांत तायडे यांनी पुस्तक, स्मृतिचिन्ह व भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला.
यावेळी सत्कारमूर्ती रामेश्वर राऊत मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, संस्थेला मायबाप मानून संस्थेची प्रतिष्ठा कायम राखण्याचा सातत्याने आपण प्रयत्न केला. संस्थेने सर्वकाही दिले, त्यामुळे ते कधीच विसरता येणार नाही. विद्यापीठ हीच मोठी उपलब्धी असून सेवानिवृत्त होत असतांना सहकारी कर्मचा-यांनी दिलेल्या आदर, प्रेमाची पोकळी कधीच भरुन निघणार नाही, असे सांगून त्यांनी सर्व सहकारी कर्मचा-यांप्रती आभार व्यक्त केले व पुढेही असाच स्नेह कायम असू द्यावा, असे आवाहन केले.
अनुराधा खडसे मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, आपल्या कामालाच आपण सेवा मानले. या संस्थेतून बाहेर पडतांना दु:ख वाटते. एक कुटुंब समजून या संस्थेत काम केले व सेवानिवृत्ती कधी आली, ते कळलेच नाही. सहकारी कर्मचा-यांनी सुध्दा मोठे सहकार्य केल्याचे त्या म्हणाल्या. नियंत्रण अधिकारी डॉ. वैशाली धनविजय, आर व्ही दशमुखे व अजय देशमुख यांनी मनोगतातून सेवानिवृत्त कर्मचा-यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ तुषार देशमुख, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी, तर आभार विद्यापीठाचे अभियंत संजय ढाकुलकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.