शिवाजी विद्यापीठाच्या डॉ प्रतिभा पाटणकर यांचा निरोप समारंभ संपन्न

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत डॉ प्रतिभा पाटणकर यांचे योगदान मोलाचे – डॉ श्रीकृष्ण महाजन

कोल्हापूर : डॉ प्रतिभा पाटणकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ प्रतिभा पाटणकर येत्या ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने अधिविभागाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आज आयोजित करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते.

डॉ महाजन म्हणाले, डॉ पाटणकर यांनी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांत शिक्षण म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने गुरु घडविणाऱ्या गुरु आहेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलेले कार्य अशा व्यक्तिमत्त्वामुळे सार्थ झालेले दिसते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Advertisement

डॉ पाटणकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, अधिविभाग हे माझे जणू दुसरे घरच बनले होते, इतकी मी त्याच्याशी एकरुप झाले. विद्यार्थ्यांनी अध्ययन आणि संशोधन या दोन गोष्टी सातत्याने करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अधिविभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉ पाटणकर यांच्या योगदानाविषयी मनोगते व्यक्त केली. यामध्ये डॉ चेतना सोनकांबळे, डॉ एम के भानारकर, डॉ रुपाली संकपाळ, डॉ विद्यानंद खंडागळे, सुहाना नायकवडी, प्राची पाटील, अतुल जाधव, स्मिता पाटील, सरस्वती कांबळे, आरती पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमास अॅड डॉ एस बी पाटणकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, डॉ निलिमा सप्रे, डॉ के बी पाटील प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ प्रतिभा पाटणकर यांच्या जीवनावरील तीन मिनिटांची ध्वनी-चित्रफित दाखविण्यात आली. डॉ महाजन यांच्या हस्ते डॉ प्रतिभा पाटणकर यांचा मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. डॉ सोनकांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. शिस्त, निष्ठा आणि समर्पण ही जीवनाची त्रिसूत्री असणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ प्रतिभा पाटणकर असा गौरव मानपत्रात करण्यात आला. डॉ खंडागळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page