‘स्वारातीम’ विद्यापीठात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे उद्गाते – डॉ प्रदीप आगलावे
नांदेड : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचार आणि कृतीतून समाजाला नवा करणारा विचार दिला. विषमतावादी मूल्य व्यवस्थेला नकार देऊन समतावादी समाजरचनेचा आग्रह धरला. आमुलाग्र परिवर्तन हा त्यांचा आग्रह होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार तर होतेच; पण त्याहूनही अधिक ते आधुनिक भारताचे उद्गाते होते. असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य- सचिव तथा प्रसिद्ध विचारवंत डॉ प्रदीप आगलावे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची नव-भारताची संकल्पना’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर होते. तर यावेळी मंचावर बीजभाषक म्हणून सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत लक्ष्मीकांत देशमुख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डी एन मोरे मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग खडके अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ पी विठ्ठल उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या बीजभाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नव-भारताच्या संकल्पनेतील महत्त्वपूर्ण पैलूंचे विश्लेषण केले. खरी लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी लोकनिष्ठा आणि नैतिकतेला डॉ.आंबेडकरांनी केंद्रस्थानी मानले. धर्मनिरपेक्षता हा शब्द राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला असला तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ घटनेत हे तत्व आधीच होते. स्त्री-पुरुष समानतेचा विचार हा नव-भारतासाठी महत्त्वाचा विचार होता. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. तसेच विवेकवादी व बुद्धीनिष्ठेसाठी बौद्धधम्माचे त्यांनी पुनर्जीवन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाहीचा विचार करताना समकालातील वास्तवाचादेखील अभ्यासकाने विचार करावा. तसेच जे समताधिष्टीत नव-समाजाचे स्वप्न डॉ आंबेडकर पहात होते. ते सत्यात उतरविण्यासाठी देखील प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ पराग खडके आणि डॉ. डी एन मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ मनोहर चासकर म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची वाटचाल कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळातही या अध्यासन केंद्राचे कार्य अधिक गतिमान केले जाईल. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला जाईल. अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासन केंद्राचे संचालक तथा चर्चासत्राचे संयोजक डॉ पी विठ्ठल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ राजेंद्र गोणारकर यांनी केले. त्यानंतर विविध सत्रात देश- विदेशातील १२० महत्त्वाच्या अभ्यासकांनी शोधनिबंधाचे सादरीकरण केले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचा समारोप करण्यात आला.